कोरोनामुळे विमान सेवेची प्रवासी संख्या ८० टक्क्यांनी घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:17 IST2021-05-06T04:17:14+5:302021-05-06T04:17:14+5:30
अल्प प्रतिसाद : कोरोनाचे प्रमाण कमी झाल्यानंतरच मुंबईची विमान सेवा नियमित होणार जळगाव : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे विमान सेवेच्या ...

कोरोनामुळे विमान सेवेची प्रवासी संख्या ८० टक्क्यांनी घटली
अल्प प्रतिसाद : कोरोनाचे प्रमाण कमी झाल्यानंतरच मुंबईची विमान सेवा नियमित होणार
जळगाव : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे विमान सेवेच्या प्रवासी संख्येवर मोठा परिणाम झाला असून, तब्बल ८० प्रवासी संख्या घटली असल्याची माहिती विमान कंपनीतर्फे देण्यात आली, तसेच कोरोना रुग्णसंख्येचे प्रमाण कमी झाल्यानंतरच मुंबईची विमानसेवा नियमित होणार असल्याचेही सांगण्यात आले.
सध्या कोरोनाच्या काळातही जळगाव विमान तळावरून आठवड्यातील चार दिवस वेळापत्रकानुसार विमानसेवा सुरू आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या सूचनेनुसार आठवड्यातील चारच दिवस ही सेवा ठेवण्यात आली आहे. यात मुंबईची विमानसेवा दर बुधवारी व रविवारी सुरू आहे. मात्र, या सेवेला कोरोनामुळे प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळत आहे. ७२ आसनी क्षमता असलेल्या या विमानात सध्या १० ते १२ प्रवासी मिळत आहेत. त्यामुळे विमान कंपनीला गेल्या दीड ते दोन महिन्यांच्या काळात एक कोटीहून अधिक आर्थिक नुकसानीचा फटका बसला असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, कोरोनामुळे प्रवाशांचा अल्प प्रतिसाद असला तरी, केंद्राच्या उडान योजनेअंतर्गत जळगावची विमान सेवा असल्यामुळे ही सेवा नियमित सुरू राहणार असल्याचे विमान कंपनीतर्फे सांगण्यात आले.
इन्फो :
...तर होणार मुंबईची सेवा नियमित
मुंबई विमान सेवेच्या आठवड्यातून दोनच फेऱ्या होत असल्याबाबत विमान कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, कोरोनामुळे राज्य शासनाने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील अनेक विमान कंपन्यांच्या उड्डाणांना बंदी घातली आहे. त्यामध्ये जळगावला विमानसेवा देणाऱ्या कंपनीचाही समावेश आहे, तर जेव्हा राज्यातील कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी होईल तेव्हाच मुंबईची विमानसेवा नियमित होणार असल्याचे विमान कंपनीतर्फे सांगण्यात आले.