व्हेंटिलेटरअभावी कोरोना रुग्णाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2020 10:22 PM2020-09-16T22:22:36+5:302020-09-16T22:23:53+5:30

अरूण तुकाराम येवले यांची ऐनवेळी प्राणवायूची क्रिया मंदावल्यामुळे जिल्ह्यात कुठेच व्हेंटिलेटर न मिळाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.

Corona patient death due to lack of ventilator | व्हेंटिलेटरअभावी कोरोना रुग्णाचा मृत्यू

व्हेंटिलेटरअभावी कोरोना रुग्णाचा मृत्यू

Next
ठळक मुद्देशासनाने व्हेंटिलेटरची संख्या वाढविण्याची अपेक्षा बाहेरून ३५ हजार रुपयांची इंजेक्शन्स आणली

बाळू चव्हाण
वरणगाव, ता.भुसावळ, जि.जळगाव : वरणगाव येथील शिवाजीनगरमधील गुरुदेव इलेक्ट्रीकल्सचे मालक अरूण तुकाराम येवले (वय ६५) यांची ऐनवेळी प्राणवायूची क्रिया मंदावल्यामुळे जिल्ह्यात कुठेच व्हेंटिलेटर न मिळाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.
याबाबतची माहिती अशी की, या रुग्णाला थोडा ताप आला असता वरणगावातील एका डॉक्टरने त्यांना कोरोना चाचणी करण्याचा सल्ला दिला होता. त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली व ते स्वत: भुसावळ येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर कोविड सेंटरमध्ये भरती झाले. परंतु दोन दिवसांनी श्वसनाचा त्रास जाणवू लागल्यामुळे त्यांना रेल्वे कोविड सेटरला नेण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यांच्या मुलाने बाहेरून ३५ हजार रुपयांची इंजेक्शन्स आणली. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागली. परंतु मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास त्यांचा अचानक प्राणवायूअभावी जीव घाबरायला लागला.
रेल्वे कोविड सेंटरमध्ये व्हेटिलेशन खाली नसल्यामुळे डॉक्टरांनी त्यांच्या मुलास बोलवून त्यांना डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय-रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. तेथेही व्हेटिलेशन मिळाले नाही. तेथून पुढे जळगावातील घोषित कोविड रुग्णालये अनुक्रमे सहारा, रुबी, गणपती, ग्लोबल, अ‍ॅपेक्स, चिन्मय व जिल्हा सामान्य रुग्णालय इत्यादी रुग्णालयांमध्ये व्हेटिलेशन सुविधा मिळण्यासाठी रात्रीच्या अडीच वाजेपर्यंत फिरविण्यात आले. शेवटी कुठेच त्यांना प्राणवायू मिळण्याची सुविधा उपलब्ध होऊ शकली नाही. अखेर त्यांना पुन्हा भुसावळातील रेल्वे कोविड सेंटरला परत आणले जात असताना रेल्वे हॉस्पीटलच्या प्रवेशद्वाराजवळच त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांचा एकुलता मुलगा कमलेश येवले याने प्रतिक्रिया व्यक्त केली की, माझ्या बाबांची घरून जाताना प्रकृती ठणठणीत होती. परंतु व्हेंटिलेशनची सुविधा न मिळाल्यामुळेच त्यांचा मृत्यू झाला. शासनाने इतर खर्च कमी करून जास्तीत जास्त व्हेंटिलेशनची सुविधा उपलब्ध करून द्यावी. जेणेकरून रुग्ण दगावणार नाही. त्यावेळी वरणगाव भाजप शहरप्रमुख महेश सोनवणे यांनी खासदार रक्षा खडसे यांना भ्रमणध्वनीवरून सर्व हकीकत कथन केली. यावर त्यांनी याबाबत पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.


व्हेंटिलेशन सुविधेबाबत भुसावळ रेल्वे हॉस्पिटलचे डॉ.हेमंत शर्मा यांनी सांगितले की, आमच्याकडे सुरुवातीपासून ही सुविधा उपलब्ध नाही. आम्ही अशा रुग्णाला डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय-रुग्णालय तथा सिव्हिल हॉस्पिटलसाठी रेफर करत असतो. रुग्णाला मात्र दोन्ही ठिकाणी सुविधा मिळू शकली नाही.

Web Title: Corona patient death due to lack of ventilator

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.