कोरोनाचा प्रभाव, मेडिकल दुकानातून सॅनिटायझर, व्हिटॅमिन पावडरची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 17:34 IST2020-07-24T17:33:50+5:302020-07-24T17:34:28+5:30
अमळनेरची घटना

कोरोनाचा प्रभाव, मेडिकल दुकानातून सॅनिटायझर, व्हिटॅमिन पावडरची चोरी
अमळनेर: कोरोनाचा सर्वसामान्यांच्या जिवनावर मोठा परिणाम झाला आहे. गेल्या चार महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे जिवनावश्यक वस्तूंखेरीज इतर व्यवसाय ठप्प झालेले आहेत. चोरट्यांनीही कोरोनाचे महत्व ओळखून मेडिकल दुकान फोडून चक्क सॅनिटायझर आणि व्हिटामिन पावडरची चोरीच केल्याचा प्रकार अमळनेर येथे उघडकीस आला आहे.
येथील बस स्थानकासमोरील प्रल्हाद रेस्टॉरंट च्या बाजूला असणाº्या निलेश फार्मा अँड मेडिकल दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी सुमारे १५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना २२ रोजी रात्री घडली असून याबाबत अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
योगेश्वर संजय चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,निलेश फार्मा अँड मेडिकल दि. २२ रोजी रात्री नेहमीप्रमाणे बंद करून घरी गेलो होतो. परंतु २३ रोजी सकाळी दुकानाच्या शटर ला लावलेले कुलूप तोडून काचेचा दरवाजा फोडलेला आढळून आला असून दुकानातील बोर्नव्हिटाचे १८०० रुपये किमतीचे ७ डबे, लोक्टोडेक्स २ नावाचे २७०० रुपये किमतीचे दुधाच्या पावडरचे डबे, ९०० रुपये किमतीचे डेक्सोलॅक प्रोटीन पावडर ३ डबे, ७ हजार रुपये चिल्लर व नोटा, १७०० रुपये किमतीचे सॅनिटायझरचे दोन कॅन, ५०० रुपये किमतीच्या सॅनिटायझरच्या ६ बाटल्या असा एकूण १५६०० रुपये किमतीचा माल व रोख रक्कम चोरून नेली आहे. याबाबत अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल बापू साळुंखे करीत आहेत.