कोरोनाने घरातील कर्ती व्यक्ती हिरावली, शासकीय मदतीची उरली केवळ आस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:15 IST2021-07-26T04:15:04+5:302021-07-26T04:15:04+5:30
स्टार ९५६ विजयकुमार सैतवाल जळगाव : कोरोनाकाळात पहिल्या फळीतील विभाग असलेल्या महसूल विभागात कोतवाल म्हणून काम करीत असलेले बाळू ...

कोरोनाने घरातील कर्ती व्यक्ती हिरावली, शासकीय मदतीची उरली केवळ आस
स्टार ९५६
विजयकुमार सैतवाल
जळगाव : कोरोनाकाळात पहिल्या फळीतील विभाग असलेल्या महसूल विभागात कोतवाल म्हणून काम करीत असलेले बाळू सुखदेव चिखलकर (कोळी) ही घरातील कर्ती व्यक्ती. कर्तव्य बजावत असताना त्यांना कोरोनाची लागण झाली आणि काही दिवसांतच त्यांचा मृत्यू झाला. कुटुंबाला मदत मिळावी म्हणून प्रस्ताव सादर केला खरा. मात्र, अजूनही मदत त्यांच्या वारसांना मिळालेली नाही. कोळी यांच्यासह अशी अनेक उदाहरणे असून, कोरोनामुळे मयत झालेल्यांचे वारस आज शासकीय कार्यालयांच्या चकरा मारत आहेत. शासकीय मदत तसेच आरोग्य विमा यांच्या रकमेसाठी फिराफिर करावी लागत असल्याचे अनेकांनी सांगितले.
मदत न मिळण्याची कारणे
१) कोरोनाकाळात सेवा बजावत असताना शासकीय कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत त्याच्या वारसाला ५० लाखांची मदत देण्याची घोषणा झाली. मात्र, यासाठी अनेक कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. ती केली तरी फाइल वेगवेगळ्या विभागांत अनेक दिवस पडून राहत आहे.
२) आरोग्य विमा काढलेला असल्यास त्यात रेमडेसिविर इंजेक्शनची रक्कम देण्यास नकार दिला जातो, तसेच डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांनी उपचारावेळी वापरलेले साहित्य हॅण्डग्लोव्हज, मास्क, पीपीई किट यांची रक्कम रुग्णांच्या बिलात लावली जाते. मात्र, या डिस्पोजेबल घटकांची रक्कम आरोग्य विम्यात मिळत नाही.
ही घ्या उदाहरणे...
१) मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळा येथे कोतवाल म्हणून असलेले बाळू सुखदेव चिखलकर (कोळी) यांचा कोरोनामुळे १८ एप्रिल रोजी मृत्यू झाला. मात्र, कुटुबीयांना अजूनही मदत मिळाली नाही.
२) भुसावळ नगरपालिकेतील चार कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मात्र, त्यांच्या कुटुंबीयांना मदत मिळाली नसल्याची माहिती न.पा. वर्कस युनियनचे अध्यक्ष राजू खरारे यांनी दिली.
३) वरणगाव न.पा.चे कर्मचारी सुरेश केशव शेळके यांचादेखील कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यांच्या वारसांनी प्रस्ताव सादर केला. मात्र, अजूनही वारसांना मदत मिळालेली नाही.
वेगवेगळ्या ठिकाणी चकरा
प्रस्ताव सादर केल्यानंतर त्यात काही त्रुटी काढल्या जात आहेत. त्यांची पूर्तता केली तरी फाइल पुढे सरकत नसल्याने नगरपालिका, तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, अशा वेगवेगळ्या ठिकाणी वारसांना चकरा माराव्या लागत आहेत. यात सुरेश शेळके यांचा मुलगा दीपक शेळके हे स्वत: पुणे येथे जाऊन आले व त्यांनी मदतीसाठी पाठपुरावा केला. तरीदेखील मदत मिळालेली नसल्याचे त्यांनी सांगितले.
अनुकंपावर नोकरी द्या
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांचा वारसांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्याची मागणीही होत आहे.