कोरोनामुळे तिसऱ्या रेल्वे मार्गाची अंतिम चाचणी रखडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:16 IST2021-03-25T04:16:42+5:302021-03-25T04:16:42+5:30
जळगाव ते भादली :१५ मार्चपूर्वी होणार होती चाचणी जळगाव : जळगाव ते भादली दरम्यान तयार झालेल्या तिसऱ्या ...

कोरोनामुळे तिसऱ्या रेल्वे मार्गाची अंतिम चाचणी रखडली
जळगाव ते भादली :१५ मार्चपूर्वी होणार होती चाचणी
जळगाव : जळगाव ते भादली दरम्यान तयार झालेल्या तिसऱ्या रेल्वे मार्गावर नियमित रेल्वे धावण्यासाठी रेल्वे प्रशासनातर्फे १५ मार्च पूर्वी अंतिम चाचणी करण्यात येणार होती. मात्र, कोरोनामुळे रेल्वे प्रशासनाने चाचणीचे काम पुढे ढकलल्याने अंतिम चाचणीचे काम रखडले आहे.
गेल्या वर्षी जळगाव ते भादली या तिसऱ्या रेल्वे मार्गाचे काम पूर्ण झाले असून,या मार्गावरून नियमित रेल्वे धावण्यासाठी भुसावळ रेल्वे प्रशासनातर्फे या मार्गाची गेल्या महिन्यात प्राथमिक चाचणी करण्यात आली. यासाठी या मार्गावर ताशी ११० किलोमीटर वेगाने इंजिन चालवून ही चाचणी घेण्यात आली. या चाचणी दरम्यान जे तांत्रिक दोष आढळून आले. ते लागलीच पूर्ण करण्यात आले. मात्र, रेल्वेच्या सुरक्षा विभागाच्या अंतिम चाचणीच्या निरीक्षणा नंतरच या रेल्वे मार्गावरून नियमित रेल्वे धावणार आहेत. त्यामुळे ही अंतिम चाचणी रेल्वे प्रशासनातर्फे १५ मार्च पूर्वी करण्यात येणार होती. मात्र, जिल्ह्यासह राज्यभरात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढल्याने, रेल्वे प्रशासनातर्फे अंतिम चाचणीचे काम पुढे ढकलण्यात आले आहे. त्यामुळे ही चाचणी कधी होणार, याबाबत सध्या कुठलीही माहिती नसल्याचे भुसावळ रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
इन्फो :
तर एक एप्रिलचा मुहूर्त लांबणीवर पडणार
रेल्वे प्रशासनातर्फे जळगाव ते भादली या तिसऱ्या रेल्वे मार्गाच्या अंतिम चाचणीचे काम मार्च मध्ये पूर्ण करून,१ एप्रिल पासून हा मार्ग सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्या दृष्टीने सर्व तांत्रिक कामेही पूर्ण करण्यात आली होती. मात्र, आता कोरोनामुळे अंतिम चाचणीचे काम रखडल्यामुळे एक एप्रिलच्या उदघाटनाचा मुहूर्त अधिकच लांबणीवर पडणार असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, हा मार्ग सुरू झाल्यावर जळगाव ते भुसावळ दरम्यानच्या वाहतुकीची वर्दळ कमी होणार असून, गाड्या विलंबाने धावण्याचे प्रमाण कमी होणार आहे.