कोरोनामुळे भुसावळ विभागातील २० पॅसेंजर बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:16 IST2021-03-23T04:16:41+5:302021-03-23T04:16:41+5:30
गैरसोय : सर्व सामान्यांना तिकीट मिळेना, ना चाकरमान्यांना मासिक पास लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आल्याने ...

कोरोनामुळे भुसावळ विभागातील २० पॅसेंजर बंद
गैरसोय : सर्व सामान्यांना तिकीट मिळेना, ना चाकरमान्यांना मासिक पास
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आल्याने वर्षभरापासून भुसावळ विभागातून धावणाऱ्या तब्बल २० पॅसेंजर बंद आहेत. इतर एक्स्प्रेस गाड्या सुरू झाल्यानंतरही पॅसेंजर सेवा सुरू न झाल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांचे चांगलेच हाल होत आहेत.
लॉकडाऊननंतर विमानसेवा, बस यासह रेल्वे सेवादेखील बंद ठेवली होती. आज या सेवेला एक वर्ष पूर्ण होत आहे. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने टप्प्याटप्प्याने कोरोना स्पेशल गाड्या सुरू केल्या आहेत. मात्र, भुसावळ विभागातून एकही पॅसेंजर सुरू केलेली नाही, तर सध्या ज्या गाड्या सुरू आहेत, त्यांनाही आरक्षण तिकिटावरच गाडीत प्रवेश देण्यात येत असून, सर्वसामान्य प्रवाशांसाठी जनरल तिकीट बंदच ठेवले आहे. या प्रकारामुळे रेल्वे प्रशासनाने सर्वसामान्य प्रवाशांना प्रवासापासून दूरच ठेवल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त करण्यात येत आहे.
विशेष म्हणजे मुंबई पॅसेंजर, देवळाली पॅसेंजर, सुरत पॅसेंजर, अमरावती पॅसेंजर अशा एकूण २० पॅसेंजर वर्षभरापासून बंद असल्याने ग्रामीण भागातील बहुतांश नागरिकांचा प्रवासच बंद झाला आहे, तर या पॅसेंजरवर अवलंबून असणाऱ्या हजारो किरकोळ व्यावसायिकांच्या रोजगारावरही परिणाम झाला आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने पुन्हा सुरू करण्याची मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.
जिल्ह्यातील बहुतांश विद्यार्थी व चाकरमाने पॅसेंजरनेच प्रवास करीत असतात. मात्र, वर्षभरापासून कोरोनामुळे या पॅसेंजर बंद असल्याने विद्यार्थी, चाकरमाने व सर्वसामान्य प्रवाशांचे चांगलेच हाल होत आहेत, तर सध्या ज्या गाड्या सुरू आहेत, त्या गाड्यांना जनरल तिकीट, मासिक पासही देण्यात येत नसल्यामुळे प्रवाशांना खाजगी प्रवासी वाहनांना दुप्पट भाडे मोजून प्रवास करावा लागत आहे. नितीन सोनवणे, अध्यक्ष, चाळीसगाव प्रवासी संघटना.