कोरोनामुळे प्रवासी वाहतुकीला ब्रेक; घराघरात वाढल्या दुचाकी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:12 IST2021-07-23T04:12:06+5:302021-07-23T04:12:06+5:30

जळगाव : कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले होते. त्यात रेल्वे, एस.टी. व खासगी प्रवाशी ...

Corona breaks passenger traffic; Bicycles grown in homes! | कोरोनामुळे प्रवासी वाहतुकीला ब्रेक; घराघरात वाढल्या दुचाकी !

कोरोनामुळे प्रवासी वाहतुकीला ब्रेक; घराघरात वाढल्या दुचाकी !

जळगाव : कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले होते. त्यात रेल्वे, एस.टी. व खासगी प्रवाशी वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठीही नियमावली लागू केली होती. त्यामुळे प्रवास करताना नागरिकांचे कमालीचे हाल होऊ लागले. भविष्यातही कोरोनाचे भूत कायम असल्याने अनेकांनी सरकारी वाहने किंवा खासगी प्रवाशी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर अवलंबून न राहता स्वत:ची वाहनेच विकत घेण्याचा निर्णय घेतला. एप्रिल ते जुलै या चार महिन्यात ६ हजार ९८ जणांनी स्वत:च्या दुचाकी तर १ हजार २३३ जणांनी कार विकत घेतल्या. त्यामुळे घराघरात वाहनांची संख्या वाढली आहे.

या काळात दुचाकींची संख्या वाढलेली असली तरी चारचाकी कारची संख्या घटलेली आहे.वर्षभरात जिल्ह्यात चार हजाराच्यावर नागरिक स्वत: कार विकत घेतात. याच काळात प्रवाशी वाहतूक करणाऱ्या रिक्षाही घटल्या आहेत. बेरोजगार असलेल्यांनी धंदाच नसल्याने याकडे पाठ फिरवली, त्यामुळे फक्त ३२ जणांनी रिक्षा घेतल्या तर २ जणांनी टॅक्सी कार विकत घेतल्या. एरव्ही दरवर्षी एक हजाराच्यावर रिक्षा विक्री होतात तर टॅक्सीकारही शंभराच्या घरात असतात. कोरोनामुळे अनेकांचा रोजगार गेला आहे. ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली, त्यांनी स्वत:ची दुचाकी व कार यासारखी वाहने खरेदी केली. कोरोनाच्या नियमातून सुटका करुन घेतली. आरटीओकडे असलेल्या आकडेवारीवरुन हे सिध्द झाले आहे.

दुचाकी-चारचाकी विक्री वाढली

दुचाकी चारचाकी

२०१९ ४३३५८ ३७४८

२०२० ३३१७२ ४४९५

२०२१ (जुलैपर्यंत)६०९८ १२३३

ऑटो-टॅक्सी कारची विक्री घटली

ऑटो टॅक्सीकार

२०१९ ११८४ ५९

२०२० १९९ १३

२०२१ (जुलैपर्यंत) ३२ ०२

ऑटोचालक-टॅक्सीचालक परेशान

-कोरोनामुळे व्यवसाय डबघाईस आलेला आहे. त्यामुळे कर्ज घेऊन प्रवाशी वाहतूक करणारे वाहन घेतले. जळगाव-पाचोरा मार्गावर बऱ्यापैकी धंदा व्हायचा. मात्र कोरोनामुळे हप्ते भरणेही अवघड झालेले आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह व हप्ते भरण्यासाठी रसवंती सुरु केली. त्यातून दोन पैसे मिळतात, उदरनिर्वाह भागतो पण हप्त्यासाठी कसरत होते.

-भाऊसाहेब देसले, टॅक्सीचालक

-शहरात रिक्षांचा धंदा कमी झालेला आहे. शहराचे क्षेत्रफळ कमी असल्याने भाडे अगदीच कमी आहे. मीटरपध्दत परवडत नाही. संसार तसेच मुलांचे शिक्षण, आजारपण व हप्ते यामुळे परेशान झालेलो आहे. काय करावे कळत नाही. कोरोनाचे कारण सांगून इतर उद्योगधंदे चालक कामाला लावत नाहीत. जेमतेम धंद्यात घरखर्च भागवावा लागत आहे.

-सुभाष पाटील, रिक्षा चालक

म्हणून घेतली चारचाकी

-कोरोना काळात सुख:दुखाच्या ठिकाणी जायला अडचणी येत होत्या. रेल्वे, बस बंद असल्याने अडचणींचा सामना करावा लागत होता. कोरोना कमी होण्याची चिन्हे नव्हती, त्यामुळे नाईलाजाने स्वत:ची चारचाकी घेतली. व्यवसायासाठीही तिची मदत होते. काही वेळा वाहन भाड्याने देऊन थोडा हातभार लागतो.

-दादाभाऊ पवार, चारचाकी मालक

- सैन्य दलात असल्याने शक्यतो वाहनाची गरज भासत नव्हती. सुटीवर असतानाच गरज भासायची. आता निवृत्त झालो आहे. बाहेर नातेवाईकांकडे किंवा काही कामासाठी कुठे जायचे असले तर बस, रेल्वेची अडचण होती. त्यामुळे स्वत:ची कार घेतली. कोरोना असला तरी बाहेर येण्याजाण्याची अडचण दूर झाली आहे.

-विलास सोनवणे (पाटील), चारचाकी मालक

Web Title: Corona breaks passenger traffic; Bicycles grown in homes!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.