लोकमत न्यूज नेटवर्क
भुसावळ : सर्व समस्या सोडवण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेला सहकार्य करणार असल्याचे आश्वासन मुंबई विभागाचे शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी सांगितले.
आमदार कपिल पाटील विधिमंडळ सदस्य समितीच्या दौऱ्यानिमित्ताने जिल्ह्यात आले. खिरोदा येथे जाताना भुसावळ येथे थांबून कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुनील सोनार, सचिव प्रा. शैलेश राणे, उपाध्यक्ष प्रा. एस. एच.चौधरी यांनी कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रमुख समस्या जाणून घेतल्या. त्यात स्वतंत्र प्रशासन, २०१२-१३ नंतरचे पायाभूत पदे, अघोषित कनिष्ठ महाविद्यालय तुकड्या अनुदानावर आणण्याच्या तसेच कनिष्ठ महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांचे पगार राष्ट्रीयीकृत बँकेतून व्हावे, शालार्थ त्रुटी, २००५ नंतर जुनी पेन्शन योजना लागू करणे, तासिका तत्त्वावर व अर्धवेळ काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांना सेवेत संरक्षण मिळण्यासंदर्भात निवेदन विधान परिषद सदस्य आमदार कपिल पाटील यांना दिले संघटनेचे ज्येष्ठ मार्गदर्शक प्रा. सुनील गरुड यांनी जळगाव येथेच आमदार कपिल पाटील यांना या समस्यांबाबत अवगत केले होते.