लोकांची संमती न घेतल्याने ‘सीएए’मुळे घटनात्मक संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 01:09 PM2020-02-24T13:09:27+5:302020-02-24T13:09:32+5:30

अ‍ॅड. भीमराव आंबेडकर : सरकारचे निर्णय अपयशी ठरत असल्याचे मत

Constitutional crisis caused by 'CAA' without people consent | लोकांची संमती न घेतल्याने ‘सीएए’मुळे घटनात्मक संकट

लोकांची संमती न घेतल्याने ‘सीएए’मुळे घटनात्मक संकट

Next

जळगाव : संपूर्ण देशाशी निगडीत एखादा मोठा मुद्दा जेव्हा हाताळला जातो, त्यावेळी लोकांची संमती घेणे अत्यंत आवश्यक असते, नागरिकत्व दुरूस्ती कायद्याच्यावेळी लोकांची संमती घेणे गरजेचे होते़ नेमके तेच सरकारने केले नाही व त्यामुळे आज घटनात्मक संकट उभे राहिले आहे, असे मत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू व भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष अ‍ॅड़ भिमराव यशवंतराव आंबेडकर यांनी व्यक्त केले़
जळगावातील बौद्ध परिषदेसाठी ते जळगावात आले असता त्यांनी पद्मालय विश्रागृहात पत्रकारांशी संवाद साधला.
अनेक राज्यांनी आज हे कायदे लागू न करण्याचा ठराव केला आहे़ मतदारांची मते जाणून घेतली असती तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती़ सरकारने या कायद्याबाबत संसदेला पटवून सांगितले, मात्र, या कायद्याची नेमकी गरज काय? त्याची फलनिष्पत्ती काय? हे लोकांना समजावून सांगणे गरजेचे होते़
भाजप सरकारचे या आधीचेही निर्णय अपयशी ठरले आहेत़ नोटबंदी हा निर्णय पूर्णता अपयशी ठरला आहे़ काळा पैसा आलाच नाही, बेराजगारी प्रचंड वाढली आहे़
समाजा- समाजामध्ये द्वेष भावना वाढली आहे़ संविधान सादर करताना भारतरत्न डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते की, सरकारने भारतीयत्व विकसित करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, आता मात्र, सर्वत्र दुहीचे वातावरण दिसते, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली़

आंबेडकरी चळवळीला चांगले भवितव्य
-आंबेडकरी चळवळीकडे केवळ राजकीय नेतृत्व म्हणून बघून तिला मर्यादित करू नका, आज शैक्षणिक, आर्थिक सामजिक दृष्ट्या समाजाचा स्तर उंचावला आहे़ आंबेडकरी चळवळीचे भवितव्य उज्ज्वल आहे, असेही त्यांनी सांगितले़ वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना विधानसभेत चांगली मते मिळाली, अनेक ठिकाणी ते दुसऱ्या क्रमांकावर होते, असा दावाही त्यांनी केला.

Web Title: Constitutional crisis caused by 'CAA' without people consent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.