रेल्वेच्या जीर्ण क्वॉर्टरमुळे रहिवाशांना सततचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:21 IST2021-09-16T04:21:02+5:302021-09-16T04:21:02+5:30
श्याम गोविंदा लोकमत न्यूज नेटवर्क भुसावळ : येथील रेल्वेच्या लिम्पस क्लब भागातील पूर्णा (पीओएच) कॉलनीतील रेल्वे क्वॉर्टरमधील ...

रेल्वेच्या जीर्ण क्वॉर्टरमुळे रहिवाशांना सततचा धोका
श्याम गोविंदा
लोकमत न्यूज नेटवर्क
भुसावळ : येथील रेल्वेच्या लिम्पस क्लब भागातील पूर्णा (पीओएच) कॉलनीतील रेल्वे क्वॉर्टरमधील जीर्ण इमारतींच्या छताचे स्लॅब कोसळत असल्याने रहिवाशांचे जीव धोक्यात आले आहेत. सुमारे ४०-५० वर्षांपूर्वी बांधकाम केलेल्या या क्वॉर्टरबद्दल संबंधित अधिकारी वर्गाकडे तक्रार केल्यावर ते दखल घेत नाहीत, अशी रहिवाशांची व्यथा आहे.
जीर्ण झालेल्या या क्वाॅर्टरमध्ये कधी कोणत्या ठिकाणचा स्लॅब कोसळेल याचा भरवसा नाही. परिणामी येथील रहिवाशांचे जीव धोक्यात आले आहेत. त्यांना घरात राहणेपण जिकिरीचे झाले आहे.
रेल्वेच्या लिम्पस क्लब भागातील पूर्णा कॉलनीतील रेल्वे क्वॉर्टर्सची अवस्था अगदी बिकट झाली आहे. बिल्डिंग नं. ११४८ एच मधील राहत्या घरातील स्लॅबचे प्लॅस्टर पडत चालले आहे. या स्लॅबचे प्लॅस्टर केव्हाही पडताना दिसून येते. काही वेळेस तर त्या घरात वावरणाऱ्यांच्या अंगावरही पडले असून, ती व्यक्ती जखमी झालेली आहे. तसेच गॅलरीही पडण्याची स्थितीची झाली आहे. अशीच परिस्थिती इतरही क्वाॅर्टर्सची झाली आहे.
याबाबत वारंवार तक्रारी देऊनही रेल्वेकडून दुरुस्ती होत नसल्याने रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
एकीकडे अधिकारी वर्ग चांगल्या मोठ्या बंगल्यात राहत आहेत. त्यांना सगळ्या सुविधा आहेत, तर दुसरीकडे कर्मचाऱ्यांची निवासस्थाने वाऱ्यावर सोडली आहेत असे म्हटले जाते. याबाबत पूर्णा कॉलनीतील रहिवाशांनी हाकेच्या अंतरावर असलेल्या आयओडब्लू कार्यालयात तक्रार केली, पण संबंधित अधिकाऱ्यांनी तक्रारीकडे लक्ष न देता उलटसुलट उत्तरे दिली, अशी रहिवाशांची तक्रार आहे.
आयओडब्लू म्हणतात, ‘छ्त गिरी तो आसमान दिख रहा होगा, तो हम काम करेंगे’, असे तेथील रहिवाशांनी सांगितले.
रेल्वे कर्मचाऱ्यांच्या परिवाराच्या समस्यांचा विषय महिलांनी ‘लोकमत’समोर मांडला.
या भागातील बिल्डिंग व रेल्वे क्वॉर्टरचे बांधकाम अतिशय जीर्ण झाले आहे. ह्या बिल्डिंगला ४०-५० वर्ष झाले आहेत. अजूनपर्यंत कोणीही अधिकारी पाहणीसाठी आलेला नाही. या जीर्ण झालेल्या घरात रेल्वे कर्मचाऱ्यांच्या पत्नी व लहान लहान मुले असतात. त्यांच्या अंगावर हे पडले तर त्यांच्या जिवाला धोका होऊ शकतो.
अशा घटना रेल्वे क्वॉर्टरमध्ये नेहमी होत असल्याने रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. बिल्डिंग पडते की काय, असे त्यांना वाटू लागले आहे. रेल्वेने रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी त्वरित उपाययोजना करावी, अशी या भागातील महिलांची मागणी आहे.
रेल्वे पूर्णा कॉलनीतील ज्या ठिकाणची बिल्डिंगच्या स्लॅबचे प्लॅस्टर पडले आहेत, ते ताबडतोब दुरुस्त करण्याच्या सूचना देतो. रेल्वेत कामचुकारपणा कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही. रेल्वे कर्मचाऱ्यांना चांगल्या सुविधा देऊ.
- नवीन पाटील, एडीआरएम, भुसावळ