ऑक्सिजन प्रकल्प, कोविड रुग्णालयांना २४ तासांत वीजजोडणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:26 IST2021-05-05T04:26:42+5:302021-05-05T04:26:42+5:30
महावितरण : जिल्ह्यातील ११ कोरोना रुग्णालयांना दिले तत्काळ कनेक्शन लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी ...

ऑक्सिजन प्रकल्प, कोविड रुग्णालयांना २४ तासांत वीजजोडणी
महावितरण : जिल्ह्यातील ११ कोरोना रुग्णालयांना दिले तत्काळ कनेक्शन
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी ऑक्सिजनच्या निर्मितीसाठी व त्याचबरोबर नवीन सुरू कोरोना रुग्णालयांसाठीही महावितरणतर्फे अवघ्या २४ तासांत नवीन वीजजोडणी करण्यात येत आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ११ कोरोना रुग्णालयांना महावितरणतर्फे अवघ्या २४ तासांत वीज कनेक्शन देण्यात आले आहे.
सध्या कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, अनेक ठिकाणी तात्काळ बेड उपलब्ध होत नसल्याने नवीन कोरोना सेंटर, रुग्णालये सुरू होत आहेत. या ठिकाणी विजेची उपलब्धता आवश्यक असल्याने, संबंधित संस्था किंवा रुग्णालय प्रशासनाने वीजजोडणीसाठी अर्ज केल्यावर महावितरणतर्फे तत्काळ या अर्जावर पुढील कारवाई होऊन, २४ तासांत वीजजोडणी करून देण्यात येत आहे. इतर वेळेस नवीन वीज कनेक्शन घेण्यासाठी अर्ज केल्यावर ग्राहकांना सर्व प्रकिया पूर्ण होईपर्यंत किमान आठ दिवस वीजजोडणीसाठी लागतात.
मात्र, सध्याची कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता महावितरणतर्फे वीज जोडणीसाठी आलेला अर्ज त्याच दिवशी निकाली काढण्याच्या सूचना महावितरणतर्फे देण्यात आल्या आहेत. तसेच ऑक्सिजनचाही तुटवडा निर्माण होत असल्याने, काही रुग्णालयांतर्फे ऑक्सिजन निर्मिती प्लांट उभारण्यात येत आहेत. अशा ठिकाणीही संबंधित रुग्णालयांनी अर्ज केल्यानंतर महावितरणचे संबंधित अधिकारी तत्काळ हा अर्ज निकाली काढून त्या ठिकाणी सुरक्षित अशी विजेची जोडणी करण्यात येत आहे. तसेच विजेचा तुटवडा निर्माण होऊ नये, यासाठी राज्यात एकूण १४ हजार केव्हीए क्षमतेपेक्षा अधिक वीजभार कार्यान्वित करण्यात आला असल्याचे महावितरण प्रशासनातर्फे सांगण्यात आले.