कॉँग्रेसची खान्देपालट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 12:50 IST2019-01-25T12:49:34+5:302019-01-25T12:50:38+5:30
लोकसभा निवडणुकीची पार्श्वभूमी

कॉँग्रेसची खान्देपालट
चंद्रशेखर जोशी
जिल्ह्यातील कॉँग्रेस पक्षाला एक वेगळी ओळख आहे. अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून असलेली ही ओळख राष्टÑीय अधिवेशनामुळे अधिकच गडद झाली. याचे परिणाम नंतरच्या कालखंडात पक्षाची जिल्ह्याच्या राजकारणावर असलेली पकड अनेक शतके कायम होती.कॉँग्रेस म्हणेल ती दिशा राजकीय क्षेत्रात असायची. पक्षाची कोणत्याही संस्थेत किंवा मतदार संघात उमेदवारी मिळावी यासाठी मोठी चढओढ असायची. मात्र ९० च्या दशकानंतर हळू हळू उतरती कळा या पक्षाला लागली. लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, सहकार क्षेत्रातील संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था अगदी एक-एक संस्था भाजपाने ताब्यात घेण्यास सुरूवातकेली. अगदी संस्थान खालसा व्हावे तद्वतच पक्षाच्या ताब्यातून या संस्था गेल्या. २०१४ च्या विधानभा निवडणुकीनंतर तर अतिशय दयनिय स्थिती या पक्षाची झाली. आता तर उमेदवारी घ्यायला कोणी तयार नसते अशी परिस्थिती पक्षाची झाली असे म्हणणे अतिशयोक्तीचे ठरणार नाही. मात्र स्थानिक काही पदाधिकाऱ्यांनी यश मिळो न मिळो लढत रहायचे अशीच भूमिका ठेवली आहे. महापालिकेत यश मिळत नसले तरी लढायचे हीच भूमिका त्यांनी ठेवली. नागरिकांच्या प्रश्नांवर आवाज बुलंद ठेवला. अशा काही मोजक्या पदाधिकाºयांमध्ये पक्षाचे महानगर कार्याध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांचे नाव निश्चितच घेतले जाते. महापालिका क्षेत्रातील नागरी समस्यांचे विषय असो किंवा समांतर रस्त्याचा विषय या संदर्भात डॉ. राधेश्याम चौधरी यांनी आवाज उठविला. केवळ आंदोलन न करता मुख्यमंत्र्यांना व्टिटरवरून सतत पाठपुरावा त्यांनी करून समांतर रस्त्यांचा कामांचा पाठपुरावा केला. सत्ताधाºयांवर याप्रश्नी वेळोवेळी धारेवर धरले. त्यांच्या आंदोलनांची विविध पातळ्यांवर निश्चितच दखल घेण्यात आली आहे. त्याचप्रमाणे आता पक्षानेही दखल घेतली असल्याचेच म्हणावे लागेल. कॉँग्रेस पक्षाने राज्यातील १३ जिल्ह्यातील जिल्हाध्यक्षांच्या नव्याने नियुक्त्या केल्या. त्यात जळगाव जिल्ह्याचाही समावेश आहे. महानगर जिल्हाध्यक्ष म्हणून डॉ. राधेश्याम चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बदल पक्षाने केल्याचे दिसून येते. पद मिळाल्याने आगामी आव्हांनांना सामोरे जाण्याची जबाबदारी आता डॉ. चौधरी यांच्यावर आली आहे. मावळते अध्यक्ष डॉ. ए.जी. भंगाळे यांनीही वेळोवेळी आपल्या पदाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. येत्या काळात लोकसभा व त्यानंर लगेच विधानसभांच्या निवडणुका आहेत. त्यांना सामोरे जाण्यासाठी कॉँग्रेसने नव्या व तरूण व्यक्तीमत्वाला संधी दिल्याचेच या निमित्तान लक्षात येत आहे.