आगामी निवडणुका काॅंग्रेस स्वबळावरच लढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:13 IST2021-06-24T04:13:19+5:302021-06-24T04:13:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : आगामी काळात होणाऱ्या सर्वच निवडणुका काँग्रेस पक्ष स्वबळावरच लढेल, त्यासाठी कार्यकर्ते कामाला लागले असल्याची ...

आगामी निवडणुका काॅंग्रेस स्वबळावरच लढणार
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : आगामी काळात होणाऱ्या सर्वच निवडणुका काँग्रेस पक्ष स्वबळावरच लढेल, त्यासाठी कार्यकर्ते कामाला लागले असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व आमदार नाना पटोले यांनी जळगाव शहरातील पद्मालय शासकीय विश्रामगृहावर बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
पटोले यांनी सांगितले की, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. मात्र या पुढील निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार आहे. त्यासाठी काम देखील सुरू आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीबाबत विचारले असता पटोले यांनी सांगितले की, विधानसभा अध्यक्ष हा काँग्रेसचाच असेल, येत्या पावसाळी अधिवेशनात त्याची निवड होणे अपेक्षित आहे. मात्र ही निवड होण्यासाठी सर्व आमदार सभागृहात असणे अपेक्षीत असते. कारण त्यात आमदारांनाच मतदान करायचे आहे. गेल्या अधिवेशनात अनेक आमदार हे कोविड संसर्गामुळे येऊ शकले नाहीत. त्यामुळे या अधिवेशनात ही निवड व्हावी. तसेच राज्यात आघाडीचे सरकार मजबूत आहे. आमच्याकडे १७० आमदार आहेत. त्यामुळे निवड होण्यात कोणतीही अडचण येणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
केंद्र सरकारवर टिका करतांना पटोले म्हणाले की, मोदींनी ठरवले तर कोरोनाचा नायनाट होईल. मात्र सध्या तशी परिस्थिती नाही. केंद्र सरकारने राज्य सरकारचे जीएसटीचे पैसे थकवले आहे. त्यामुळे राज्य सरकार समोर आर्थिक प्रश्न आहेत, असेही पटोले यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेनंतर काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यातही त्यांनी स्वबळाचाच नारा दिला. तसेच सध्या जळगाव शहरात शिवसेना आणि भाजपा यांच्या बाबत जनतेचे प्रतिकूल मत आहे. त्यामुळे काँग्रेसला संधी असल्याचेही पटोले यांनी सांगितले. तत्पूर्वी फैजपूर येथील ऐतिहासिक भूमीतून केंद्र सरकारच्या तीन काळ्या कृषी कायद्यांविरुद्ध त्यांनी आंदोलनाचे रणशिंग फुंकले. केंद्र सरकार इंग्रजांपेक्षाही जुलमी असल्याची टीका त्यांनी केली. त्यानंतर डाॅ.उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात त्यांच्या हस्ते कोरोना योद्धांचा सत्कार करण्यात आला. तसेच शेतक*यांसाठी अन्यायकारक असलेल्या कृषी कायद्यांची त्यांनी होळी केली.