काँग्रेस जिल्हा बँकेची निवडणूक स्वबळावर लढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:20 IST2021-08-23T04:20:02+5:302021-08-23T04:20:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : पुढील महिन्यात होणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक काँग्रेस पक्ष स्वबळावर लढविणार असल्याची माहिती ...

काँग्रेस जिल्हा बँकेची निवडणूक स्वबळावर लढणार
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : पुढील महिन्यात होणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक काँग्रेस पक्ष स्वबळावर लढविणार असल्याची माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप पाटील यांनी दिली. काँग्रेसला मानणारा मोठा गट सहकार क्षेत्रात असून, याचा फायदा येणाऱ्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत काँग्रेसला होईल अशी आशादेखील ॲड. संदीप पाटील यांनी व्यक्त केली आहे. रविवारी काँग्रेस भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीसंदर्भात रविवारी काँग्रेस भवनात काँग्रेसच्या जिल्हाभरातील नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीनंतर काँग्रेसच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका जाहीर केली आहे. पत्रकार परिषदेला काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा आमदार शिरीष चौधरी, माजी खासदार उल्हास पाटील, डी. जी. पाटील, माजी जिल्हाध्यक्ष उदय पाटील, जिल्हा बँकेचे संचालक डॉ. सुरेश पाटील, आर. जी. पाटील, माजी आमदार रमेश पाटील यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारीदेखील उपस्थित होते. काँग्रेसची ताकद सहकार क्षेत्रात वाढावी म्हणून जिल्हाभरातील सर्वच पदाधिकाऱ्यांचा जिल्हा बँकेची निवडणूक लढविण्याचा आग्रह असल्याने ही निवडणूक स्वबळावरच लढविण्याची तयारी झाली असल्याची माहिती ॲड. संदीप पाटील यांनी दिली.
२१ जागा लढण्याची तयारी
जिल्हा बँकेच्या सर्व २१ जागा लढण्यासाठी काँग्रेसकडे सक्षम उमेदवार असल्याचेही ॲड. पाटील यांनी सांगितले. १५ तालुक्यांमधून जो ही निवडणुकीत टक्कर देऊन विजयी होऊ शकतो, असे उमेदवार काँग्रेसकडे आहे. तसेच सर्वपक्षीय पॅनलबाबत कोणतीही चर्चा इतर पक्षांसोबत झाली नसल्याचीही माहिती त्यांनी दिली. रविवारी झालेली बैठक ही प्राथमिक असून, लवकरच पुढील रणनितीबाबत बैठका घेतल्या जातील अशीही माहिती ॲड. पाटील यांनी दिली.
जिल्हा बँकेच्या सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांची केली निराशा केली - डॉ. उल्हास पाटील
जिल्हा बँकेतील विद्यमान सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांची निराशा केली आहे. सत्ताधाऱ्यांना भक्कम पर्याय देण्यासाठीच काँग्रेसने स्वबळाची तयारी केली असल्याची माहिती माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी दिली. स्वतंत्र पॅनल तयार करून ही निवडणूक लढविली जाणार असल्याचे सांगितले. तसेच इच्छुकांसाठी काँग्रेसकडून निरीक्षक नेमले जाणार असून, निरीक्षकांकडून पडताळणी करून उमेदवार निश्चित केले जातील, अशीही माहिती डॉ. पाटील यांनी दिली.