लस न घेता प्रमाणपत्र: कुठे लस मिळेना
जळगाव: शनिवारी शहरातील सर्वच लसीकरण केंद्रांवर लसीकरण सुरू होते. यात काही केंद्रांवर गोंधळ उडाला होता. यात शाहू महाराज रुग्णालयातील केंद्रावर लस घेतली नाही; मात्र प्रमाणपत्र आल्याचा प्रकार घडला.
नानिबाई रुग्णालयात ऑनलाइन बुकिंग करूनही डोस न मिळाल्याने गर्दी झाली होती. शिवाय नागरिकांनी संतापही व्यक्त केला. केंद्रावर सकाळपासून गर्दी झालेली होती. विविध केंद्रांवर गर्दीचे चित्र होते. शहरातील शाहू महाराज रुग्णालयातील केंद्रावर एका महिलेने लस घेतली नाही; मात्र त्या घरी गेल्यानंतर त्यांच्या मोबाइलवर लस घेतल्याचा मॅसेज आला. मोबाइलवर त्यानंतर त्यांनी प्रमाणपत्रही डाउनलोड केले; मात्र लस न घेता प्रमाणपत्र कसे आले? ही शंका घेऊन त्या पतीसह महापालिकेच्या केंद्रावर गेल्या. त्या ठिकाणी त्यांची नोंद नव्हती; मात्र नंतर सायंकाळी लस घ्यायला या, असे त्यांना सांगण्यात आले.
लसीकरण वेगात
जळगाव शहरासह जिल्हाभरात लसीकरण मोहिमेला गेल्या पंधरा दिवसांपासून गती आली आहे. यात शहरातही मोठ्या प्रमाणात लसीकरण होत आहे.
मनपाचे केंद्र आज बंद
मनपाचे सर्व लसीकरण केंद्र रविवार, १२ रोजी बंद राहणार असल्याची माहिती मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.राम रावलानी यांनी दिली.