तालुक्यातील लसीकरण केंद्रांवर गोंधळ कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:38 IST2021-09-02T04:38:02+5:302021-09-02T04:38:02+5:30
जळगाव : गेल्या काही दिवसांपासून शहरासह तालुक्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू आहे. मात्र, केंद्रांवर कुठल्या ना कुठल्या कारणांमुळे ...

तालुक्यातील लसीकरण केंद्रांवर गोंधळ कायम
जळगाव : गेल्या काही दिवसांपासून शहरासह तालुक्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू आहे. मात्र, केंद्रांवर कुठल्या ना कुठल्या कारणांमुळे अजूनही गोंधळ कायम आहे. बुधवारी ममुराबाद येथील लसीकरण केंद्रावर कुपन वाटपावरून प्रचंड गोंधळ झाला, तर शनिपेठेतील शाहीर अमर शेख रुग्णालय येथे वीज गुल झाल्याने काहीवेळ लसीकरण थांबले होते.
लसीचे डोस प्राप्त झाल्यानंतर बुधवारी शहरासह तालुक्यातील काही केंद्रांवर लसीकरण झाले. धामणगाव आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या ममुराबाद उपकेंद्रावर लसीकरणासाठी पहाटेपासून नागरिकांनी रांग लावली होती. याठिकाणी लसीचे चारशे डोस उपलब्ध झाले होते. दरम्यान, आपले लसीकरण आधी व्हावे, यासाठी पहाटे तीन वाजल्यापासून काहींनी केंद्राच्या बाहेर हजेरी लावली होती. मात्र, सकाळी लसीकरण केंद्र सुरू झाल्यानंतर कुपन वाटपावरून प्रचंड गोंधळ उडाला. त्यात उशिरा येणाऱ्या काही नागरिकांना आधी कूपन दिले जात असल्याचा आरोपही नागरिकांनी केला. त्यानंतर केंद्रावर नागरिकांनी प्रचंड गोंधळ घातला. काही वेळानंतर लसीकरण केंद्रातील कर्मचारी व नागरिकांमध्ये जोरदार वाद झाल्याचे पाहायला मिळाले. दुसरीकडे गोंधळामुळे सोशल डिस्टन्सिंगचाही फज्जा उडाला होता, तर काहींनी मास्कचा वापरसुध्दा केलेला नव्हता.
वीज गुल अन् नोंदणी थांबली
शहरातील शनिपेठ भागातील शाहीर अमर शेख या लसीकरण केंद्रावरसुध्दा लस घेण्यासाठी नागरिकांची मोठी रांग लागलेली होती. मात्र, दुपारी या केंद्रावर वीज गुल झाल्यामुळे काही वेळासाठी नोंदणी थांबली होती. त्यामुळे लसीकरणही थांबले होते. मात्र, अर्ध्या तासानंतर वीज पुरवठा सुरूळीत झाल्यानंतर लसीकरणाला पुन्हा सुरूवात झाली होती.