आशादीप वसतिगृहात चौकशी समितीसमोरच गोंधळ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:29 IST2021-03-04T04:29:28+5:302021-03-04T04:29:28+5:30
भाजपच्या माजी आमदार स्मिता वाघ, सामाजिक कार्यकर्त्या सरिता नेरकर यांनीही सकाळी वसतिगृहात धाव घेऊन मुलींशी चर्चा केली. याप्रकरणाची चौकशी ...

आशादीप वसतिगृहात चौकशी समितीसमोरच गोंधळ !
भाजपच्या माजी आमदार स्मिता वाघ, सामाजिक कार्यकर्त्या सरिता नेरकर यांनीही सकाळी वसतिगृहात धाव घेऊन मुलींशी चर्चा केली. याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी प्रांताधिकारी तृप्ती घोडपिसे यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीने वसतिगृहाच्या अधीक्षक, परिविक्षाधीन महिला अधिकारी तसेच वसतिगृहातील महिला व मुलींची चौकशी केली. दरम्यान, ज्या मुलीने सामाजिक कार्यकर्त्यांकडे तक्रार केली, त्याच मुलीने तीन गरोदर मुलींना मारहाण केली. त्यामुळे या मुलींना तसेच अन्य दोन मुलींनीही मागणी केल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने निरीक्षणगृहात पाठविण्यात आले असून एका तक्रारदार मुलीला पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पोलिसांविषयी बोलण्यास नकार
दरम्यान, चौकशीच्या नावाखाली काही पोलिसांकडूनच गैरप्रकार केला जात असल्याचा आरोप करून सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली होती. सोबत वसतिगृहातील कर्मचारीच मुलींना कपडे काढून नृत्य करायला लावत असल्याबाबतची कैफियत एक मुलगी मांडत असल्याचाही व्हिडिओ सादर केला होता. त्याअनुषंगानेही बुधवारी चौकशी करण्यात आली, मात्र पोलिसांविषयी कोणीच उल्लेख केला नाही. नृत्य करायला लावल्याबाबत एक मुलगी ठाम आहे, परंतु तिला बोलूच दिले गेले नाही. आरती मोरे या महिलेने नृत्य करायला लावले, अशी माहिती एका मुलीने आपल्याजवळ दिल्याचे माजी आमदार स्मिता वाघ यांनी सांगितले. एकंदरीत रहिवासी, वसतीगृहाचे कर्मचारी, तेथील मुली यांच्याकडून मिळणाऱ्या माहितीतही तफावत आढळून आली.
दिवसभर चौकशी
प्रांताधिकारी तृप्ती घोडमिसे यांनी दिवसभर वसतिगृहात चौकशी केली तर दुसरीकडे पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून नेमका प्रकार काय आहे, याची चौकशी सुरू केली आहे. सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांनीही घटनास्थळी भेट देऊन माहिती जाणून घेतली. जिल्हा पेठ पोलीस सीसीटीव्ही फुटेज मिळविण्याच्या कामाला लागलेले होते.
वसतिगृहात सध्या १२ मुली
आशादीप वसतिगृहात एकूण १८ मुली होत्या. त्यापैकी तक्रार मुलीने मारहाण केल्याने ३ गर्भवती मुलींना आणि अन्य दोन मुलींनी मागणी केल्याने त्यांनाही अशा ५ मुलींना जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने निरीक्षणगृहात हलविण्यात आले आहे. तर एका तक्रारदार मुलीला पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सध्या वसतिगृहात १२ मुली आहेत.