वरणगाव, ता. भुसावळ : सेंट्रल बँकेच्या येथील शाखेत अपूर्ण कर्मचारी वर्गामुळे ग्राहकांचे हाल होत आहेत. याबाबत भाजपने बँकेच्या व्यवस्थापकांची भेट घेतली व बँकेबाबतची व्यथा खासदार रक्षा खडसे यांच्याकडे मांडली.
येथील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना आधार कार्ड लिंकसाठी सेंट्रल बँकेत जावे लागते. त्यावेळी तेथील कर्मचारी ते काम वरणगावला होणार नाही, तुम्हाला थांबावे लागेल, भुसावळला जा, अशी उडवाउडवीची उत्तरे देतात. तसेच केवायसीसुद्धा बँकेत केले जात नाही. यासह अनेक अडचणींना नागरिकांसह विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागते. त्यासाठी बँकेचा स्टाफ वाढवून कर्मचारी वर्गाने ग्राहकांच्या अडचणी सोडविण्याची मागणी येथे भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
विद्यार्थांना विविध शैक्षणिक कामासाठी बँक खाते उघडणे आवश्यक आहे. हे खाते झिरो बॅलन्समध्ये उघडण्याचे आदेश सर्व बँकांना देण्यात आले आहेत; परंतु असे खाते येथे उघडले जात नाही, तसेच पेन्शनधारकांना तासन्तास रांगेमध्ये उभे राहावे लागते. याबाबत १३ जुलै रोजी भाजपच्यावतीने येथील व्यवस्थापक चटर्जी यांना माजी नगराध्यक्ष सुनील काळे, सुनील माळी, पप्पू ठाकरे, मिलिंद भैसे, साबीर कुरेशी, कमलाकर मराठे, आकाश निमकर, राहुल जंजाळे, तेजस जैन यांनी धारेवर धरत तत्काळ समस्या निवारण करण्याची मागणी केली, तसेच खासदार रक्षा खडसे यांनी मॅनेजर यांना फोनवरून जनतेच्या अडचणी सोडवा, अन्यथा तुमची वरिष्ठांकडे तक्रार करेल व कर्मचारी संख्या अपूर्ण असेल तर प्रस्ताव तत्काळ विभागीय व्यवस्थापकांकडे पाठवा, मी वरिष्ठ पातळीवर त्याबाबत चर्चा करून समस्या सोडविते, असे आश्वासन खासदार खडसे यांनी दिले.