भुसावळ : येथील रेल्वेच्या मिल्ट्री स्टेशनजवळील क्षेत्रीय प्रशिक्षण संस्थेकडे जाणारे मुख्य गेट मंगळवारी चालू-बंद होत राहिल्याने नागरिकांचे हाल झाले.
सूत्रांनुसार, भुसावळ ईटारसी अपलाईनचे रुळ बदली करण्याचे काम खांबा नं. ४४७/२३ वर रेल्वेने सुरु केल्यामुळे मंगळवारी तीन ते चार तास रेल्वेचे मिल्ट्री स्टेशनजवळील क्षेत्रीय प्रशिक्षण केंद्राकडे जाणारे मुख्य गेट बंद करण्यात आले होते. हा रस्ता त्या भागातून जाणारा एकमेव आहे. या रस्त्यावरुन रेल्वेच्या उत्तर भागातील रेल्वे कर्मचारी तसेच कंडारी, लिम्पस क्लब, ऑर्डनन्स फॅक्टरी, दीपनगर, वरणगाव, मुक्ताईनगर, साकरी,फेकरी, रेल्वेच्या पंधरा बंगला या भागातील हजारो वाहनधारकांचे रेल्वेने पूर्वसूचना न दिल्यामुळे हाल झाले. ऐन दुपारी बाराच्या आसपास गेट बंद असल्याने अनेकांचे हाल झाले.
रेल्वेने गेट बंद करण्यापूर्वी पर्यायी व्यवस्था करायला हवी होती, असेही काही नागरिकांनी म्हटले आहे.