चक्रवाढ व्याजासाठी जळगावात सावकारांकडून छळ
By Admin | Updated: April 18, 2017 16:56 IST2017-04-18T16:56:55+5:302017-04-18T16:56:55+5:30
सावकाराकडून 25 टक्के व्याजदराने रक्कम घेतल्यानंतर मुदतीत व्याजासह रक्कम परत केल्यानंतरही चक्रवाढ व्याजासाठी शहरातील पाच सावकरांकडून छळ होत आहे.

चक्रवाढ व्याजासाठी जळगावात सावकारांकडून छळ
जळगाव,दि.18- व्यवसायासाठी खासगी सावकाराकडून 25 टक्के व्याजदराने रक्कम घेतल्यानंतर मुदतीत व्याजासह रक्कम परत केल्यानंतरही चक्रवाढ व्याजासाठी शहरातील पाच सावकरांकडून छळ होत आहे. सावकारांकडून धमक्या दिल्या जात असल्याची तक्रार गणेश एकनाथ आकुल-माळी (रा.शिवाजी नगर, जळगाव) या तरुणाने पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.
माळी या तरुणाने गोवर्धन करसुळे यांच्याकडून दीड लाख, सुरेश रामचंद्र गायकवाड यांच्याकडून दोन लाख , धोंडीबा मारुती कोंडाळकर यांच्याकडून साडे तीन लाख, आसीफ टेलर यांच्याकडून दोन लाख व दत्तू जाधव यांच्याकडून 50 हजार रुपये 2014-15 या वर्षात 25 टक्के व्याजदराने घेतले होते. या रकमेतून किचन ट्रॉलीचा व्यवसाय सुरु केला. या व्यवसायात फायदा झाल्याने सर्व सावकारांची व्याजासह पैसे परत केले, मात्र व्यवसायतील प्रगती पाहून या लोकांकडून चक्रवाढ व्याजासाठी धमक्या दिल्या जात आहे. त्यांच्या या छळाला कंटाळून माळी याने 9 जानेवारी 2017 रोजी विषप्राशन करुन आत्महत्येचा प्रय} केला. या लोकांविरुध्द सावकारी कायद्याखाली गुन्हा दाखल करावा अशी मागणी माळी यांनी केली आहे.