४६० घरकुलांची कामे तातडीने पूर्ण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:22 IST2021-08-20T04:22:27+5:302021-08-20T04:22:27+5:30
चाळीसगाव : चाळीसगाव तालुक्यातील अपूर्णावस्थेतील ४६० घरकुलांची कामे तातडीने पूर्ण करावीत. घरकुलांसाठी अनुदान घेऊनही ते न पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्यांवर ...

४६० घरकुलांची कामे तातडीने पूर्ण करा
चाळीसगाव : चाळीसगाव तालुक्यातील अपूर्णावस्थेतील ४६० घरकुलांची कामे तातडीने पूर्ण करावीत. घरकुलांसाठी अनुदान घेऊनही ते न पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्यांवर कारवाई करा, अशा स्पष्ट सूचना जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिल्या.
गुरुवारी त्यांनी पं.स.मध्ये विविध विभागाचा आढावा घेतला. यावेळी गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी त्यांना माहिती दिली. डॉ. पंकज आशिया यांनी पं. स.मध्ये सकाळी ११ ते दुपारी दोन असे तीन तास सर्व विभागांच्या कामकाजाचा आढावा घेतला. त्यांनी विभागनिहाय कामांबाबतही सूचना दिल्या. दुपारी २.३० वाजता त्यांनी तालुक्यातील हगणदारी व डासमुक्त चैतन्यनगर तांडा या गावाला देखील अचानक भेट दिली.
यावेळी त्यांनी गावकऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नांचे कौतुक केले. सरपंच अनिता राठोड, उपसरपंच आनंदा राठोड, ग्रामसेवक संघटनेचे सचिव संजीवकुमार निकम, कैलास माळी, आर. आय. पाटील, माजी अध्यक्ष दिनकर राठोड, ग्रामपंचायत सदस्य वसंत राठोड, मंगेश राठोड, संतोष पवार यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाघळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रालाही त्यांनी भेट दिली.
चौकट
शाळांमध्ये नळ जोडणीची कामे पूर्ण करा
तालुक्यात जि.प.च्या १९० प्राथमिक शाळा असून यापैकी फक्त २१ शाळांमध्ये नळजोडणी आहे. उर्वरित १६९ शाळांमध्ये नळ जोडणी तात्काळ देण्यात यावी, अशा सूचना डॉ. पंकज आशिया यांनी दिल्या.
१. तालुक्यातील ११० ग्रा.पं.चे जलजीवन मिशन आराखड्यांबाबतही त्यांनी माहिती घेतली. २६ ग्रा.पं.चे आराखडे तयार झाले असून उर्वरित ७४ आराखडे तयार करण्याविषयी निर्देश दिले.
२. टाकळी प्र.चा., उंबरखेडे, वाघळी या तीन गावांची माझी वसुंधरा अभियानासाठी निवड झाली असून याचेही नियोजन आराखडे तयार करण्याच्या सूचना डॉ. पंकज आशिया यांनी दिल्या.