ग्रामस्थांनी मांडल्या व्यथा : साकेगावात तब्बल चार वर्षांनंतर ऑन कॅमेरा झाली ग्रामसभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:35 IST2021-09-02T04:35:37+5:302021-09-02T04:35:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क भुसावळ : कोरोनाविषयक नियमांमुळे गेल्या दोन वर्षांपासून तालुक्यासह जिल्ह्यात ग्रामसभा झाली नाही. ‘लोकमत’ने ...

ग्रामस्थांनी मांडल्या व्यथा : साकेगावात तब्बल चार वर्षांनंतर ऑन कॅमेरा झाली ग्रामसभा
लोकमत न्यूज नेटवर्क
भुसावळ : कोरोनाविषयक नियमांमुळे गेल्या दोन वर्षांपासून तालुक्यासह जिल्ह्यात ग्रामसभा झाली नाही. ‘लोकमत’ने ‘गावातील ज्वलंत समस्या सुटण्यासाठी ग्रामस्थांना आता ग्रामसभेची आस’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर प्रशासनाने याची गांभीर्यपूर्वक दखल घेत तालुक्यातील सर्वच गावांना ग्रामसभेच्या नियोजनाच्या सूचना केल्या. साकेगाव येथे तब्बल चार वर्षांनंतर झालेल्या ऑन कॅमेरा ग्रामसभेत नागरिकांनी विविध प्रश्न मांडले. यावर ‘आश्वासन नको, कृती करावी’, अशी भूमिका नागरिकांनी ग्रामसभेत घेतली.
पावसामुळे प्रथमच ग्रामसभा ही ग्रामपंचायत कार्यालयाच्या वरच्या मजल्यावर घेण्यात आली. गावात सध्या सोशल मीडियावर कोल्ड वॉर सुरू आहे. याचे पडसाद ग्रामसभेत उमटू नये याकरिता दक्षता म्हणून पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीत ऑन कॅमेरा ग्रामसभा झाली.
चुडामण नगरसह शाळेकडे भागातील नागरिकांना फेऱ्याने जावे लागणार
चिखली - तरसोद महामार्ग चौपदरीकरणाचे कार्य जवळपास संपुष्टात आले आहे. या प्रकल्पाचे कंपनीचे मुख्य कार्यालय हे गावातच असूनही फक्त गावातील मोठ्या भूखंडाची एनओसी देण्यातच पुढाऱ्यांना धन्यता वाटली व यातही मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी करीत महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू असताना चुडामणनगर, शाळेकडील भागातील वाढीव वस्तीच्या नागरिकांना भुसावळकडे जाण्यासाठी बोगदाच सोडण्यात आलेला नाही. यावर कुठलेही अर्ध फाटे करण्यात आले नाही. नियोजन करण्यात आले नसल्याचा ज्वलंत प्रश्न ग्रामसभेत मांडला. इतर सर्व प्रश्न महामार्ग प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांकडून सोडविले; मात्र हा ज्वलंत प्रश्न का दिसला नाही? यावर गोंधळ झाला.
डुकरांमुळे शेतशिवारासह ग्रामस्थांना त्रास
गावात मोठ्या प्रमाणात डुकरांचा उच्छाद वाढत आहे. याशिवाय डुकरे शेतकऱ्यांच्या शेतात घुसून उभ्या पिकांचे नुकसान करत आहेत, यावर त्वरित उपाययोजना करावी, अशा सूचना करण्यात आल्या. यावर संबंधितांनी यावर लगेच कारवाईचे आश्वासन दिले.
ग्रामस्थांनी ग्रामसभा केली ‘एन्जॉय’
वास्तविक अनेक वर्षांनंतर झालेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी आपल्या प्रभागातील प्रश्न मांडून ते कशा पद्धतीने लवकरात लवकर सुटतील यावर चर्चा होणे अपेक्षित असताना काही मोजक्या लोकांनी त्यावर प्रकाश टाकला. मात्र, युवकांसह नागरिकांनी सत्ताधाऱ्यांना विरोधकांसह नागरिक काय प्रश्न विचारतात? त्याचे सत्ताधारी कशा पद्धतीने उत्तर देतील, ग्रामपंचायतीच्या आतील विषय चव्हाट्यावर येतील का? या उत्सुकतेपोटी एन्जॉय म्हणून ग्रामसभेस गर्दी केली होती.
संपूर्ण परिसरात डेंग्यू पार्श्वभूमीवर व्हावी फवारणी
गावात डेंग्यूने मोठ्या प्रमाणात डोके वर काढले आहे. ग्रामपंचायत प्रशासनातर्फे प्रभागात फवारणी सुरू आहे, मात्र ती प्रभावीरीत्या प्रत्येक प्रभागातील गल्ली-बोळात व्हावी, अशी अपेक्षा यावेळी ग्रामस्थांनी केली.
दरम्यान, ग्रामसभेत विविध विषयांवर आलेल्या अर्जांचे वाचन करण्यात आले. याशिवाय विविध समित्यांची स्थापना शासकीय निकषाप्रमाणे करण्यात येईल याची माहिती देण्यात आली.
आश्वासन नको, कृती हवी
गावातील अनेक ज्वलंत प्रश्न नागरिकांनी उपस्थित केले. यावर ‘आश्वासन नको, प्रत्यक्षात कृती व्हावी’, अशी अपेक्षा नागरिकांनी यावेळी व्यक्त केली.
या सभेत सत्ताधारी व विरोधी पक्षाचे पुढारी, ग्रामविकास अधिकारी एच. डी. पाटील, गावातील काही प्रतिष्ठित नागरिक, याशिवाय गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक घनश्याम चौधरी, मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका शबनम पटेल, आरोग्य केंद्राच्या दीप्ती पाटील, ज्योती घुले, आशावर्कर, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पोलीस निरीक्षकांची ग्रामसभेला भेट
तालुका पोलीस ठाण्याचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक विलास शेंडे यांनी ग्रामसभा शांततेत व्हावी, कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये याकरिता प्रथमच साकेगावला भेट देत ग्रामसभेची माहिती घेतली.