जिल्हाधिकारी, डॉक्टर होऊन समाजाची सेवा करणार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:17 IST2021-05-18T04:17:30+5:302021-05-18T04:17:30+5:30
- डमी अपुऱ्या मनुष्यबळाचा कुटुंबव्यवस्थेवर परिणाम जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य व पोलीस यंत्रणा अहोरात्र काम करीत आहे. या ...

जिल्हाधिकारी, डॉक्टर होऊन समाजाची सेवा करणार !
- डमी
अपुऱ्या मनुष्यबळाचा कुटुंबव्यवस्थेवर परिणाम
जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य व पोलीस यंत्रणा अहोरात्र काम करीत आहे. या काळात दोन्ही घटकांतील योध्द्यांचे कुटुंबाकडे काहीसे दुर्लक्ष होत चालले आहे. त्यामुळे या कुटुंबातील मुलांचा या क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत चालला आहे, तर काहींच्या मते जनसेवेची ही मोठी संधी चालून आलेली आहे. असे काम करण्यास एक आनंद व आत्मिक समाधान मिळते. दुसऱ्याच्या चेहर्यावरील आनंद यातच खरा आनंद आहे. समाजात आल्यानंतर आपण काहीतरी करू शकलो, याचे एक आत्मिक समाधान माणसाला लाभते. 'फ्रन्ट लाईन वर्कर' म्हणून कार्य करणाऱ्या या यंत्रणेतील मुलांच्या मनातील गुपित 'लोकमत' ने जाणून घेतले असता या मुलांनी भवितव्याविषयी त्यांची मते स्पष्टपणे मांडली. आपले वडील करीत असलेले कार्य एक कर्तव्य तर आहेच, परंतु एक महान काम आहे, अशी भावना या मुलांनी व्यक्त केली. काहींनी या दोन्ही क्षेत्रांच्या पलीकडे जाऊन समाजसेवा करण्याचा मानस व्यक्त केला.
शासकीय रुग्णालयातील डॉक्टर : १५०
आरोग्य कर्मचारी : २२००
पोलीस अधिकारी : १९६
पोलीस कर्मचारी : ३२२३
पोलीस व्हायला आवडेल पण....
प्रतिक्रिया
वडिलांसारखीच समाजसेवा करायला आवडेल. मात्र, पोलीस खात्यात नाही जाणार. जिल्हाधिकारी बनेन. वंचित न्यायासाठी अपेक्षेने सरकारी यंत्रणेकडे येतात. त्यांना न्याय मिळवून दिला तर आपल्याला एक वेगळे समाधान मिळते.
- तिथी रामकृष्ण पाटील
प्रतिक्रिया
वडील पोलीस खात्यात आहेत. पोलीस खात्यातील व्यक्ती कुटुंबाला वेळ देऊ शकत नाही, हे आम्ही जवळून अनुभवत आहोत. मात्र, जनतेची सुरक्षा करण्याची एक मोठी जबाबदारी या घटकावर असते. त्यामुळे पोलीस खात्याविषयी अभिमान आहे. कोरोना काळात लोकांचे हाल होत आहेत. त्यामुळे भविष्यात डॉक्टर होऊन समाजाची सेवा करणार.
- संस्कार रतन गीते,
प्रतिक्रिया
भारतीय प्रशासन सेवेत जाऊन जनतेची सेवा करायची आहे. तळागाळातील व गोरगरीब जनतेला या माध्यमातून न्याय देता येऊ शकतो. प्रशासन सेवेत जिल्हाधिकारी बनणे हे स्वप्न आहे. कोरोनाच्या काळात जिल्हाधिकारी यांचीच भूमिका महत्त्वाचे ठरत आहे.
- किनिशा अमोल विसपुते
काय वाटतं डॉक्टरांच्या मुला-मुलींना
प्रतिक्रिया
जनतेची खऱ्या अर्थाने सेवा करायची असेल तर वैद्यकीय क्षेत्र त्यासाठी महत्त्वाचे आहे. वडील डॉक्टर आहेत. कोरोनाच्या काळात त्यांच्या हातून खूप जनसेवा होत आहे. गोरगरीब जनतेच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचे एक महान कार्य वडिलांच्या हातून होत आहे, त्यामुळे मीदेखील डॉक्टर होऊन अशीच जनसेवा करणार आहे.
- नाव्या संदीप पाटील
प्रतिक्रिया
डॉक्टरांना लोक देव मानतात, असे ऐकले आहे. मृत्यूच्या दाढेत गेलेल्या व्यक्तिला त्यातून बाहेर काढण्याची किमया डॉक्टरच करू शकतात. अशा परिस्थितीत एखाद्या व्यक्तिला जीवदान मिळाले तर त्या व्यक्तिचा पुनर्जन्म झालेला असतो. कोरोनाच्या काळात डॉक्टर अनेक लोकांचे जीव वाचवत आहेत. डॉक्टर किंवा प्रशासन सेवेत जाऊन जनतेची सेवा करण्याचा मानस आहे.
- सानवी सुनील बोदामवाड
प्रतिक्रिया
समाजसेवेसाठी वैद्यकीय क्षेत्र अतिशय योग्य आहे. मात्र, प्रत्येक क्षेत्रातील डॉक्टर असो किंवा अन्य कोणी, त्यांना कुटुंबाकडे लक्ष द्यायला वेळच नसतो. स्वतःसाठीही वेळ नसतो. वडील डॉक्टर असले तरी या क्षेत्रात न जाता प्रशासकीय सेवेतून समाजाची सेवा करणार आहे.
- अथर्व जितेंद्र मोरे (कोळी)