थंडी अन् धूळ दमा रुग्णांसाठी ठरतेय घातक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 14:56 IST2020-12-27T14:55:42+5:302020-12-27T14:56:36+5:30
वाढत्या थंडीसोबतच धुळीमुळे दमा रुग्णांचा व्रास वाढतो. अशा परिस्थितीत रुग्णांनी आवश्यक खबरदारी घेण्याची गरज आहे.

थंडी अन् धूळ दमा रुग्णांसाठी ठरतेय घातक
भुसावळ : शहरातील तसेच महामार्ग रस्ते निर्मितीचे कार्य प्रगतिपथावर असल्याने सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले आहे. अशातच गत आठवडाभरापासून थंडीचाही जोर वाढला असून, धुक्यांचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे दमा रुग्णांना श्वसनाशी निगडीत समस्या वाढल्याचे दिसून येत आहे.
ज्या रुग्णांना श्वसनाशी निघडीत आजार आहेत, अशा रुग्णांना कोरोनाचा धोका कायम असताना, आता वाढती थंडी आणि शहरातील धूळ घातक ठरत आहे. शहरातील प्रमुख रस्ते निर्मितीचे काम सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. त्यात गत आठवडाभरापासून थंडीचाही जोर वाढत आहे. त्याचा सर्वाधिक त्रास श्वसनाशी निघडीत आजार असलेल्या रुग्णांना होत आहे.
प्रामुख्याने दमा असणाऱ्यांना मास्कचा होतेय फायदा
कोरोनाच्या भीतीमुळे अनेक जण मास्कचा वापर करत आहेत. त्यामुळे नाकात धूळ जात नाही. परिणामी श्वसनाशी निगडीत समस्या कमी झाल्याचे निदर्शनास येत आहे. परंतु जे रुग्ण मास्क वापरत नाही, अशा रुग्णांसाठी वातावरणातील बदल डोकेदुखी ठरत आहे.
दमा रुग्णांनो, हे करा
धुळीपासून सावध राहा
धुळीच्या ठिकाणी मास्कचा वापर करा.
रस्त्यावरील धूळ आणि थंडी हवा थेट फुफ्फुसाची क्षमता वाढविण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने व्यायाम करा
नियमित वापराचे औषध बंद करू नका
पाळीव प्राण्यांच्या केसापासूनही रुग्णांनी दूर राहा
घरात स्वच्छता ठेवा
वाढत्या थंडीसोबतच धुळीमुळे दमा रुग्णांचा व्रास वाढतो. अशा परिस्थितीत रुग्णांनी आवश्यक खबरदारी घेत धुळीपासून स्वतःचे संरक्षण करण्याची गरज आहे.
- डॉ. मयूर नितीन चौधरी, वैद्यकीय अधीक्षक, भुसावळ
रुग्णांसाठी ही थंडी आणि धूळ घातक ठरत आहे. खबरदारी घेत प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, असे आवाहन वैद्यकीय अधिकारी अशा रुग्णांना देत आहेत.