सण-उत्सवाची चाहूल लागताच नारळ ३० रुपयांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:21 IST2021-08-24T04:21:35+5:302021-08-24T04:21:35+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोना संसर्ग, सतत होणारी इंधन दरवाढ यामुळे नारळाचे माहेरघर असलेल्या दक्षिण भारतातून येणाऱ्या नारळाच्या ...

Coconut at Rs | सण-उत्सवाची चाहूल लागताच नारळ ३० रुपयांवर

सण-उत्सवाची चाहूल लागताच नारळ ३० रुपयांवर

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोना संसर्ग, सतत होणारी इंधन दरवाढ यामुळे नारळाचे माहेरघर असलेल्या दक्षिण भारतातून येणाऱ्या नारळाच्या आवकवरही परिणाम झाला आहे. त्यामुळे यंदा नारळाच्या भावात मोठी वाढ होऊन किरकोळ बाजारात नारळ प्रति नग ३० रुपयांवर पोहोचले आहे. नारळाचे भाव वाढले असले तरी त्याची मागणी घटली नसून सण-उत्सवामुळे मागणी वाढतच आहे. विशेष म्हणजे सध्या मंदिर बंद असले तरी मागणी कायम असून मंदिर खुले झाल्यानंतर त्यात आणखी वाढ होण्याचा अंदाज आहे.

प्रत्येक शुभकार्यासाठी प्रथम आवश्यक असते ते नारळ. त्यामुळे विविध पूजा, शांती, लग्नसमारंभातील वेगवेगळे विधी, मंदिर, तीर्थस्थानावर देवदर्शनाला गेल्यावर अगोदर खरेदी होते ती नारळाची. इतकेच नव्हे तर उद्घाटन, शुभारंभप्रसंग तसेच सत्कार असो अथवा निरोप समारंभ असो तेथेही असते ते नारळच. त्यामुळे केवळ ठरावीक ऋतूचे फळ नसलेल्या व या सर्व कारणांमुळे खरोखरच ‘श्री’फळ (आद्य फळ) ठरणाऱ्या या नारळाला वर्षभर मागणी असते.

सण-उत्सवांचे आगमन आणि दीडपट भाववाढ

रक्षाबंधन सणामुळे नारळाची मागणी वाढली. आता त्या पाठोपाठ पोळा सण तोंडावर असून त्यानंतर गणेशोत्सव, नवरात्र असा सणोत्सवाचा काळ असल्याने नारळाची मागणी वाढतच जाणार आहे. त्यात २० ते २५ रुपयांवर असलेले नारळ आता थेट ३० रुपये प्रति नगावर पोहोचले आहे. सध्या वाढलेली मागणी ही आता थेट भाऊबीजपर्यंत कायम राहणार आहे. धार्मिक विधी, सण-वार, सत्कार, उद्घाटन यासह नारळाचा वापर खाद्यपदार्थांमध्येही होतो. इडली, वडा, सांबार, चटणी या दक्षिण भारतीय खाद्यपदार्थांची विक्री चांगली असून आता हॉटेल, खाद्यपदार्थांची दुकाने सुरू झाल्याने त्यांच्यासाठीही ओल्या खोबऱ्याचीच मागणी असल्याने नारळाची विक्री वाढली आहे.

२५ टक्के भाडेवाढ

शुभकार्याचा अविभाज्य घटक असलेल्या नारळाचे भाव गगनाला भिडत आहे. तामिळनाडू, आंध्र प्रदेश या भागातून येणाऱ्या नारळाच्या वाहतुकीसाठी मोठे भाडे मोजावे लागते. त्यामुळे इंधन दरवाढीचा यावर लगेच परिणाम जाणवतो. सध्या डिझेलचे दर नव्वदीपार गेल्याने मालवाहतुकीच्याही दरात मोठी वाढ झाली आहे. पूर्वी एका ट्रकचे भाडे ६० हजार रुपये लागत होते, ते आता ७५ हजार रुपयांवर पोहचले आहे. या शिवाय कोरोना संसर्गामुळे झाडांवरून नारळ उतरविणे, माल वाहनांमध्ये चढविणे यावरही परिणाम झाल्याने आवक काहीसी कमी झाली असल्याचे व्यापाऱ्यांच्यावतीने सांगण्यात येत आहे. दररोज जळगावात एक हजार ते १२०० गोण्या नारळ येतात. मात्र यात साधारण २०० गोण्यांची घट झाली आहे. असे असले तरी मागणी मात्र कायम असून यामुळे भाववाढही होत आहे.

-------

सण-उत्सवामुळे नारळाला मागणी वाढू लागली आहे. त्यात इंधन दरवाढीने भाडेवाढही झाली असून कोरोनामुळेही आवकवर काहीसा परिणाम आहे. त्यामुळे नारळाचे भाव वाढत आहेत.

- अशोक धूत, नारळ व्यावसायिक

Web Title: Coconut at Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.