साफसफाईवरून महासभेत गदारोळ

By Admin | Updated: October 21, 2014 13:11 IST2014-10-21T13:11:03+5:302014-10-21T13:11:03+5:30

शहरात गेल्या दोन-तीन महिन्यांपासून प्रचंड घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याच्या विषयावर विशेष महासभेत चांगलाच गदारोळ झाला.

Cleanliness in the General Assembly | साफसफाईवरून महासभेत गदारोळ

साफसफाईवरून महासभेत गदारोळ

 

जळगाव : शहरात गेल्या दोन-तीन महिन्यांपासून प्रचंड घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याच्या विषयावर विशेष महासभेत चांगलाच गदारोळ झाला. सत्ताधार्‍यांतर्फेच सादर केलेल्या लक्षवेधीवरील चर्चेत ठेकेदाराकडील कामगार लावण्यात घोळ करीत असल्याचा आरोप नितीन लढ्ढा यांनी आरोग्याधिकार्‍यांवर करीत कारवाईची मागणी केली. आयुक्तांनी सभा संपल्यावर आरोग्य विभागाची बैठक घेऊन दोषींवर कारवाईचे आश्‍वासन दिले. 
सभेला सुरुवात होताच स्थायी समिती सभापती नितीन लढ्ढा यांनी साफसफाईच्या विषयावर लक्षवेधी सादर केली. त्यांनी सांगितले की शहरात साफसफाईबाबत भयावह परिस्थिती निर्माण झाली असून अद्यापही कर्मचार्‍यांचा संप मिटला आहे की नाही? असा प्रश्न पडतो. याला जबाबदार कोण? काहीच ठोस पावले उचलली जाणार नाहीत का? याबाबत प्रशासनाने भूमिका स्पष्ट करावी. भाजपाचे नगरसेवक सुनील माळी यांनी त्यांच्या वॉर्डातील आरोग्याची स्थिती गंभीर असून २-३ डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत. घंटागाडी बंद आहे. आरोग्यनिरीक्षक तक्रारीची दखल घेत नाहीत. त्यांच्यावर अधिकार्‍यांचा वचक नसल्याचा आरोप केला. 
विष्णू भंगाळे साफसफाईबाबत तक्रार करताना म्हणाले, की कर्मचारी सही करून निघून जातात. त्याकडे आरोग्य निरीक्षक दुर्लक्ष करतात. अनिल देशमुख यांनी मेहरूण परिसरात गोळा केलेला कचरा डंपिंग केला जात असल्याचे सांगितले. जयश्री पाटील, नितीन बरडे, भागचंद जैन, रवींद्र पाटील आदींनी कचरा उचलला जात नसल्याबाबत तक्रार केली. वर्षा खडके यांनी मच्छी मार्केटजवळ अळ्या निघाल्याचा मुद्दा मांडला. 
बरडे यांनी त्यांच्या वॉर्डात सफाईचा ठेका दिला आहे. मात्र त्यांच्याकडे ट्रॅक्टर आहे. घंटागाडी या वॉर्डात फिरकत नाही. भाड्यानेही दिली नाही, अशी तक्रार केली. त्यावर आरोग्याधिकारी डॉ.विकास पाटील यांनी ८ घंटागाड्या बंद असून ३ मोठी वाहने बंद असल्याचे सांगितले. त्यासाठी जास्त खर्च लागणार असल्याने बंद असल्याचे सांगितले. त्यावर बरडे यांनी १ महिन्यापासून घंटागाडी नाही. १0 वाजताच कर्मचारी घरी निघून जातात. कोणत्या वॉर्डातील घंटागाडी निघाली की नाही? याची माहिती आरोग्याधिकारी घेतात का? अशी विचारणा केली. त्यावर आरोग्याधिकार्‍यांनी घंटागाडीची दुरुस्ती झाली आहे. मात्र १0 हजार रुपये बिलाअभावी बंद असल्याचे सांगितले. त्यावर सदस्यांनी पैशांसाठी पाठपुरावा केला का? आयुक्तांना याविषयी सांगितले का? अशी विचारणा केली. आयुक्तांनी समस्यांबाबत भावना वस्तुस्थितीला धरून आहेत. कचरा शहरात इतरत्र डंपींग न करता कचरा डेपोतच गेला पाहिजे. त्यावर नियंत्रण असले पाहिजे. कामकाजात सुधारणा करण्याची गरज आहे, असे वारंवार सांगूनही आरोग्याधिकार्‍यांबाबत तक्रारी येतच असल्याने त्याबाबत खुलासा घेऊन कारवाई करावी लागेल, असा इशारा दिला. आरोग्याधिकार्‍यांना ५0 हजार रुपये कायमस्वरूपी खर्चासाठी अँडव्हान्स मंजूर आहे. तत्काळ दुरुस्तीची गरज असल्यास काम अडून राहू नये म्हणून ही तरतूद केली आहे. शिवाय दुरुस्ती करून बिल दिल्यास खर्च झालेली रक्कम त्वरित मिळून ५0 हजार शिल्लक त्यांच्याकडे राहील, याबाबत सूचनाही दिल्या आहेत. असे असतानाही वाहन किरकोळ रक्कमेसाठी दुरुस्तीअभावी पडून असल्याच्या तक्रारी आहेत. नागरिकांच्या तक्रारींची तातडीने दखल आरोग्याधिकार्‍यांकडून घेतली जात नसल्याबद्दलही आयुक्तांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. आरोग्याधिकार्‍यांचा खुलासा मागविण्यात येईल. त्यात तथ्य न आढळल्यास कारवाई केली जाईल, असे सांगितले. त्यावर लढ्ढा यांनी यापूर्वीही अनेकवेळा असा इशारा दिला असूनही सुधारणा होत नाही. मक्तेदाराचे २00-४00 कर्मचारी लावले जातात. त्याचे हिशेब हेच ठेवतात. मात्र कुंपणच शेत खाते. ३0-४0 टक्के सफाई कर्मचारी कागदोपत्री दाखविले जात असल्याचा आरोप केला. आरोग्याधिकारी सक्षम नाहीत. त्यामुळे पुन्हा विषाची परीक्षा नको. त्यांच्याऐवजी अन्य अधिकार्‍याला जबाबदारी द्यावी. आताच योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी केली. मात्र आयुक्तांनी सभा संपल्यावर आरोग्य विभागाची बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले.
 
■ आरोग्याधिकारीपदी डॉक्टर व्यक्तीचीच नेमणूक करता येत असल्याने व आरोग्याधिकार्‍यांना त्यांच्या मूळ पदावर पाठविणे शक्य नसल्याने त्यांच्याकडील साफसफाईची जबाबदारी काढून घेण्यात येऊन केवळ जन्म-मृत्यू विभागाची जबाबदारी ठेवली जाणार आहे. तर साफसफाईची जबाबदारी उदय पाटील यांच्याकडे सोपविली जाणार असल्याचे समजते. सभेच्या सुरुवातीलाच सभागृहनेते रमेशदादा जैन यांनी सभागृहातील दोन सदस्य प्रा.चंद्रकांत सोनवणे व सुरेश भोळे हे विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. या दोन्ही सदस्यांना जळगाव शहराचे प्रश्न माहीत असल्याने भविष्यात मनपाचे प्रश्न सोडविण्यासाठी विशेष प्रयत्न करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच महापौर राखी सोनवणे, स्थायी समिती सभापती नितीन लढ्ढा, भाजपा गटनेते डॉ.अश्‍विन सोनवणे, उज्‍जवला बेंडाळे, अनिल देशमुख, ज्योती चव्हाण, अँड.शुचिता हाडा, विजय गेही, पृथ्वीराज सोनवणे, सुनील माळी यांनीही अभिनंदनाचा प्रस्ताव दिला.
 
 
महापौरांनी फटकारले
रवींद्र पाटील यांनी सफाईच्या विषयावरील चर्चेत 'अच्छे दिन आ गए' असे सांगितले. त्यावर भागचंद जैन यांनी पहिलेही अच्छे दिन होते. मात्र अधिकारी काम करत नाहीत. असे सांगितले. त्याच दरम्यान विजय गेही मध्येच काहीतरी बोलले, त्याचा राग जैन यांना आल्याने त्यांनी गेही यांना 'भाषा नीट वापरा' असे सुनावले. तर महापौरांनी आम्हाला शिकवण्याची गरज नाही. सभागृहात परवानगी घेऊन बोलत जा, असे फटकारले. त्यावर अँड.संजय राणे यांनी तुमच्या कामाबद्दल शंका नसून समस्या पूर्ण जळगावची आहे. दिवाळीपूर्वी प्रशासनाने सुविधा पुरविली पाहिजे, असे सांगितले. 

Web Title: Cleanliness in the General Assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.