चिंचपुरा येथे सफाईदारपणे चोरी, साडेचार लाखाचा मुद्देमाल लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:12 IST2021-07-23T04:12:30+5:302021-07-23T04:12:30+5:30
चिंचपुरा येथील महेश पाटील या शेतकरी कुटुंबाच्या घरात ही चोरीची घटना आज गुरुवार रोजी पहाटे २ ते ४ च्या ...

चिंचपुरा येथे सफाईदारपणे चोरी, साडेचार लाखाचा मुद्देमाल लंपास
चिंचपुरा येथील महेश पाटील या शेतकरी कुटुंबाच्या घरात ही चोरीची घटना आज गुरुवार रोजी पहाटे २ ते ४ च्या दरम्यान घडली आहे. घरातील सर्व सदस्य पुढील खोलीत झोपले असताना मागील लाकडी दरवाजास चोरांनी छिद्र पाडले व घरात प्रवेश करून रोख रक्कम असलेली पेटी उचलून नेली. तसेच कपाटात ठेवलेले सोने-चांदीचे दागिने देखील लंपास केले. घरातील सर्व सदस्य चोरी झाली, त्या खोलीच्या पुढच्याच खोलीत झोपलेले होते. परंतु अगदी सफाईदारपणे चोरांनी चोरी केल्याने घरातील कुणालाही आवाजदेखील आला नाही.
पहाटे ५ वाजता महेश यांच्या पत्नी दीपाली या उठल्या असता दरवाजा उघडा दिसला व कपाट उघडे दिसले तसेच पेटीदेखील दिसून आली नाही, त्यांनी सर्वाना जागे केले. महेश पाटील हे शेतीसह ट्रॅक्टर व बैलजोडी भाड्याने देण्याचा व्यवसाय करतात. त्यांची नुकतीच व्यवसायातून मिळालेली दीड लाखाची रक्कम खत घेण्यासाठी व मजुरी वाटपासाठी घरात ठेवलेली होती. या दीड लाखांच्या रकमेसह घरातील महिलांचे व लहान मुलांचे जवळपास ३० ग्रॅम सोने-चांदी असा मुद्देमाल चोरांनी गायब केला आहे.
घरातील रोख रक्कम व दागिने असलेली पेटी घेऊन घराच्या मागील बाजूला असलेल्या त्यांच्या शेतात सर्व वस्तू काढून चोरांनी पोबारा केला. याबाबत पोलीस पाटील किरण पाटील व सरपंच कैलास पाटील यांना सांगितले असता त्यांनी तत्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली. धरणगाव पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक अंबादास मोरे, पाळधी पोलीस दूरक्षेत्रचे पोलीस उप निरीक्षक गणेश बुवा यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली व श्वान पथकालादेखील पाचारण केले.
श्वान पथकातील श्वानाने शेतातून सरळ रस्त्याकडे धाव घेतल्याने चोरांनी कोणत्या तरी वाहनाने रस्त्यावरून पसार झाल्याचे प्रथम दर्शनी लक्षात येत असल्याची माहिती महेश पाटील यांनी दिली. तसेच घटनास्थळी ठसे तपासणीचे पथकदेखील येऊन गेले. या घटनेचे पोलिसांच्यावतीने सखोल चौकशी केली जात असल्याचे माहिती पोलीस पाटील यांनी दिली.
220721\22jal_7_22072021_12.jpg
चिंचपुरा येथे सफाईदारपणे चोरी, साडेचार लाखाचा मुद्देमाल लंपास