जळगावात दोन गटात तुफान हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 23:43 IST2019-08-24T23:42:54+5:302019-08-24T23:43:54+5:30
रात्री ९ वाजेची घटना : एमआयएमच्या अध्यक्षासह चार जखमी

जळगावात दोन गटात तुफान हाणामारी
जळगाव : नेरी नाका परिसरात शनिवारी रात्री ९ वाजता दोन गटात वाद होऊन तुफान हाणामारीची घटना घडली. त्यात एमआयएमचे शहराध्यक्ष रेयान जहागीरदार, रमीज खान, रिजवान जहागीरदार व आबीद बिसमिल्ला बागवान हे चार जण जखमी झाले ंआहेत. या घटनेमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
नेरी नाक्याजवळ खालीद शेख शब्बीर (रा.रजा कॉलनीं) हा बुट विक्रेता रस्त्यावर दुकान लावून बसलेला असताना तेथे तीन जण आले व बुट घेण्याच्या कारणावरुन या तिघांनी खालीदशी वाद घालून मारहाण केली. त्यानंतर हे तिघं जण परत नेरी नाक्याकडे आले. तेथे आबीद बिसमिल्ला बागवान हा चिकू विक्रेता हातगाडीजवळच मोबाईलवर बोलत होता. बागवान हा मुले बोलावत असल्याच्या संशयावरुन या तिघांनी त्यालाही बेदम मारहाण केली.
मध्यस्थी करायला आलेल्यांना मारहाण
या वादात मध्यस्थी करायला आलेले एमआयएमचे शहराध्यक्ष रेयान जहागीरदार, रमीज खान व रिजवान जहागीदार यांनाही मारहाण करण्यात आली. यावेळी दोन्ही गटाकडून मोठा जमाव जमला होता. दगडफेक व लाथाबुक्यांनी मारहाण करण्यात येत होती. रमीज याच्या डोक्यात गंभीर दुखापत झाली. चौघा जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.