शहर विकास आघाडीचे पालिकेसमोर ढोल बजाओ आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:21 IST2021-08-24T04:21:09+5:302021-08-24T04:21:09+5:30
चाळीसगाव : शहरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून, सर्वत्र पावसामुळे चिखल तयार झाला आहे. याचा त्रास शहरवासीयांना भोगावा लागत ...

शहर विकास आघाडीचे पालिकेसमोर ढोल बजाओ आंदोलन
चाळीसगाव : शहरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून, सर्वत्र पावसामुळे चिखल तयार झाला आहे. याचा त्रास शहरवासीयांना भोगावा लागत आहे. नगरपालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांनी झोपेचे सोंग घेतले आहे. सत्ताधारीच खड्डेमय रस्त्यांना जबाबदार आहेत. येत्या १५ दिवसांत रस्त्यांची डागडुजी न झाल्यास रस्त्यांवरील खड्ड्यांमध्येच अर्धनग्न आंदोलन करू, असा इशारा शहर विकास आघाडी व राष्ट्रवादीतर्फे येथे देण्यात आला.
सोमवारी तहसील कार्यालय ते नगरपालिका असे ढोल बजाव आंदोलन करण्यात आले.
शहरात सर्वत्र रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली आहे. सुधारित पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू असल्याने रस्ते फोडण्यासह खड्डे केले गेले. मात्र, जलवाहिन्यांची कामे झाल्यानंतर फोडलेले रस्ते आणि खड्डे तसेच ठेवण्यात आले. पावसाळा सुरू झाल्याने अशा रस्त्यांवरून चालणेही कठीण झाले असून, गेल्या महिनाभरापासून याविषयी समाजमाध्यमांवर तीव्र संताप व्यक्त होत आहे.
पालिकेतील विरोधी शविआने रस्त्यांच्या कामांसंदर्भात पालिकेला यापूर्वी १५ दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. तथापि, रस्त्यांची दुरुस्ती झाली नाही. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी पुन्हा आंदोलन करण्यात आले. आंदोलनात राष्ट्रवादीचे जि. प.चे गटनेते शशिकांत साळुंखे, जिल्हा दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील, सभापती अजय पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष किसन जोर्वेकर, नगरसेवक भगवान पाटील, दीपक पाटील, रामचंद्र जाधव, सुरेश चौधरी, सूर्यकांत ठाकूर, शेखर देशमुख, माजी नगरसेवक शाम देशमुख यांच्यासह प्रदीप अहिरराव, भैयासाहेब पाटील, शुभम पवार, यज्ञेश बाविस्कर, मोहित भोसले, आकाश पोळ, प्रदीप राजपूत, वीरेंद्रसिंग राजपूत, प्रशांत पाटील उपस्थित होते. यावेळी उप मुख्याधिकारी स्नेहा फडतरे यांना निवेदन देण्यात आले.
चौकट
...तर अर्धनग्न आंदोलनही करणार
पालिकेचे झोपलेले प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांचा हलगर्जीपणा चव्हाट्यावर आणण्यासाठीच ढोल बजाव आंदोलन करण्यात आल्याचे सांगून १५ दिवसांत रस्त्यांची कामे सुरू न झाल्यास अर्धनग्न आंदोलन करू, असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला.
प्रमोद पाटील : पालिका प्रशासनाने रस्त्यांच्या कामांबाबत २१ जून रोजी एक कोटी ४४ प्रस्ताव पाठविल्याचे सांगितले. मात्र, हा प्रस्ताव अजूनही मंजूर झाला नाही. पावसाळ्याचे तीन महिने संपले आहेत. सत्ताधाऱ्यांची स्थिती ‘नाचता येईना अंगण वाकडे, स्वयंपाक येईना लाकडे ओले’ अशीच झाली आहे. त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते.
किसन जोर्वेकर : सत्ताधारी आपली जबाबदारी झटकून विरोधकांची बदनामी करीत आहेत. स्थायी समितीचे अध्यक्ष हे भाजपचे आहेत. त्यामुळे स्थायी समितीत विरोधकांचे बहुमत आहे, हा मुद्दा हास्यास्पद आहे. सत्ताधाऱ्यांकडे बहुमत असताना काय केले? हा आमचा सवाल आहे. सत्ताधाऱ्यांना इतर कामांसाठी पैसा उपलब्ध होतो. मात्र, रस्त्यांच्या कामासाठी तो मिळत नाही.
रामचंद्र जाधव : पालिका प्रशासनाला रस्त्यांच्या कामाबाबत यापूर्वीही आंदोलन करून सूचना दिली होती. मात्र, रस्त्यांची स्थिती जैसे थे आहे. येत्या १५ दिवसांत रस्त्यांचा हा गंभीर झालेला प्रश्न न सुटल्यास शविआचे गटनेते, माजी आमदार राजीव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली खड्ड्यांमध्ये उतरून अर्धनग्न आंदोलन करू.
शहरातील रस्त्यांची तात्पुरती डागडुजी सुरू केली आहे. रविवारी सिग्नल पाॅईंट ते दयानंद काॅर्नरपर्यंत काम झाले. पूर्णवेळ मुख्याधिकारी नसल्याची अडचण आहे. विरोधक आगामी काळात पालिकेची होत असलेली निवडणूक लक्षात घेऊन आंदोलन करीत आहेत.
-आशालता चव्हाण,
नगराध्यक्षा, नगरपालिका, चाळीसगाव.
रस्त्यांच्या कामांबाबतचा प्रस्ताव २१ जून रोजी जळगाव येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडे पाठविला आहे. प्रस्तावाला मंजुरी मिळताच निविदा काढून रस्त्यांच्या कामाला सुरुवात केली जाईल.
- स्नेहा फडतरे, उपमुख्याधिकारी, चाळीसगाव.