बोदवडात खड्डेमय रस्त्यांनीच होते नागरिकांचे स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:16 IST2021-07-29T04:16:54+5:302021-07-29T04:16:54+5:30
बोदवड : शहरातील गजबजलेल्या व शहराचे मुख्य प्रवेशद्वार असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात रस्त्याला ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, ...

बोदवडात खड्डेमय रस्त्यांनीच होते नागरिकांचे स्वागत
बोदवड : शहरातील गजबजलेल्या व शहराचे मुख्य प्रवेशद्वार असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात रस्त्याला ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, या खड्ड्यात लहान मोठे अपघात होत असून, हा रस्ता अपघाताला आमंत्रण देणारा ठरला आहे.
शहराच्या नगरपंचायत हद्दीत तसेच राष्ट्रीय महामार्ग औरंगाबाद इंदूरला जोडलेला हा चौक नेहमी वर्दळीत असतो. याठिकाणी शहरात जाणारा मार्ग त्याचप्रमाणे बस स्टँड व मलकापूर चौफुलीला जोडणारा हा चौक असून, मोठमोठे खड्डे या रस्त्याला पडलेले आहेत. परंतु नगरपंचायत त्याचप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभागाचे साफ दुर्लक्ष असल्याने ते एखाद्या अपघाताची वाट तर पाहात नाही ना, असा सवाल केला जात आहे.
याबाबत नगरपंचायतीचे नगराध्यक्षा मुमताज बी. सईद बागवान यांची प्रतिक्रिया घेतली असता, हा चौक राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा असून, या ठिकाणी लवकरच काम सुरू होणार आहे, तोपर्यंत मुरूमचा भराव टाकून देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
सार्वजनिक बांधकाम सहाय्यक अभियंता प्रवीण बेडकुळे यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांचा संपर्क क्रमांक बंद होता. राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अभियंता डी. जी. पवार यांची प्रतिक्रिया सध्या काम बंद आहे. परंतु उद्या पाहणी करून त्वरित खड्डे भरण्यासाठी सूचना देतो, रस्त्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.