अंडरपासखाली साचलेल्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:20 IST2021-09-04T04:20:54+5:302021-09-04T04:20:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : महामार्गाच्या कामातील अनेक चुका आता हळूहळू समोर येत आहेत. महामार्गावर दादावाडी आणि गुजरात पेट्रोल ...

अंडरपासखाली साचलेल्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : महामार्गाच्या कामातील अनेक चुका आता हळूहळू समोर येत आहेत. महामार्गावर दादावाडी आणि गुजरात पेट्रोल पंप येथील अंडरपास येथे थोड्या पावसानेदेखील पाणी साचत असल्याचे समोर आले आहे. गेल्या काही दिवसांपासून ही समस्या समोर आली आहे. त्याशिवाय अग्रवाल चौक, प्रभात चौकाच्या आसपासच्या रस्त्यातदेखील पाणी साचणे, चिखल होणे यामुळे अपघाताची शक्यता आहे.
शहरातून जाणारा महामार्गाचे काम फक्त सात किमीचे असले तरी त्यातील अनेक अडचणी समोर येत आहेत. गरजेच्या ठिकाणी उड्डाणपूल किंवा अंडरपास न बांधणे, बांधलेल्या अंडरपासच्या उंचीचा प्रश्न अशा अनेक समस्या समोर येत आहेत. गेल्या दोन ते तीन दिवसांमध्ये जळगाव शहरात समाधानकारक पाऊस झाला. या पावसासोबतच दादावाडी येथील पुलाच्या खाली पाणी साचण्याची समस्या समोर आली आहे. त्यामुळे या परिसरात नागरिकदेखील वैतागले आहे. येथे पाण्याचा निचरा होण्याची पुरेशी व्यवस्था नसल्याचे समोर आले आहे.
उंचीची आहे समस्या
दादावाडी येथील अंडरपासचे उतार नीट झालेले नाहीत. त्यासोबतच रस्त्याच्या एका बाजूने उंची जास्त असल्याने तेथे पाणी साचत आहे. अशीच समस्या प्रभात चौकात निर्माण झाली असती. मात्र त्याकडे शहरातील आर्किटेक्ट शिरीष बर्वे यांनी लक्ष घातले. त्यामुळे तेथील उंचीची समस्या दूर करण्यात आली होती.
अग्रवाल चौकात होतो चिखल
अग्रवाल चौकात अंडरपासचे काम सुरू आहे. या ठिकाणी झांबरे शाळेच्या बाजूने जाणाऱ्या रस्त्यावर मोठा चिखल होतो. त्यावर काही दिवस आधी तात्पुरता मुरूम टाकण्यात आला होता. मात्र त्याचा फारसा झालेला नाही. या ठिकाणी थोडा जरी पाऊस झाला तरी चिखल तयार होतो. आणि वाहनधारकांना कसरत करावी लागते.
कोट - शहरातून जाणाऱ्या महामार्गाच्या आराखड्यातच अनेक चुका आहेत. त्याकडे शहरातील अभियंते, अधिकारी आणि लोक प्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे. शहरातील सर्वांची एकत्र बैठक व्हायला हवी. त्याकडे कुणीही लक्ष देत नाही. हा रस्ता आता पुढची अनेक वर्षे अशा चुकांसहच शहरवासीयांच्या माथी मारला जाणार आहे - शिरीष बर्वे, आर्किटेक्ट
कोट - यात दोन्ही बाजूंचे सर्व्हिस रोड आणि त्यांची जोडणी पूर्ण झाले की ही अडचण येणार नाही. सध्या सर्व्हिस रोड हा वर झाला आहे. आणि अंडरपासचा स्लॅब खाली गेला आहे. त्यामुळे काँक्रीटला अंडरपासवर पाहिजे आणि सर्व्हिस रोड खाली पाहिजे, असे झाले तर तेथे पाणी साचणार नाही. - तुषार तोतला, अभियंता