नागरिकांनी मागणी केली मुरूम टाकण्याची, मनपाने टाकला कचरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:13 IST2021-07-15T04:13:32+5:302021-07-15T04:13:32+5:30
प्रजापत नगरात मनपाचा प्रताप ; नाल्यातून काढलेली घाण टाकली रस्त्यावर लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील रस्त्यांची अक्षरश वाट ...

नागरिकांनी मागणी केली मुरूम टाकण्याची, मनपाने टाकला कचरा
प्रजापत नगरात मनपाचा प्रताप ; नाल्यातून काढलेली घाण टाकली रस्त्यावर
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील रस्त्यांची अक्षरश वाट लागली असून, महापालिकेकडून रस्त्यांची दुरुस्तीसाठी कोणत्याही ठोस उपाययोजना होताना दिसून येत नाही. त्यात प्रजापत नगरातील खराब रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी या भागातील रहिवाशांनी केल्यानंतर मनपाने या रस्त्याची दुरुस्ती तर केलीच नाही. मात्र, या रस्त्यावर मुरूम टाकण्याऐवजी नाल्यातून काढलेला गाळ व कचरा टाकण्याचा संतापजनक प्रताप मनपाने केला आहे. मनपाच्या या कारनाम्यामुळे परिसरातील रहिवाशांकडून संताप व्यक्त केला जात असून, याठिकाणी टाकण्यात आलेला गाळ आता मनपात फेकण्याचा इशारा या भागातील रहिवाश्यांनी दिला आहे.
शहरातील प्रजापत नगर, पवन नगरकडून येणाऱ्या नागरिकांना शहरात येण्यासाठी ममुराबाद रस्त्याकडून आसोदा रस्त्याकडे जाणारा एकमेव रस्ता आहे. काही वर्षांपूर्वी मनपा प्रशासनाने हा रस्ता दुरुस्त करण्याचे आश्वासन या भागातील रहिवाशांना दिले होते. मात्र, वर्षभरात ही दुरुस्ती करण्यात आली नाही. त्यात आता पावसानंतर हा रस्ता पायी चालण्याचाही लायकीचा राहिलेला नाही. यामुळे या भागातील रहिवाश्यांनी मनपा प्रशासनाकडे या रस्त्यावर मुरूम टाकण्याची मागणी केली होती. याबाबत रहिवाशांनी मनपा प्रशासनाकडे निवेदन देखील सादर केले होते.
मुरमाऐवजी टाकला कचऱ्याने भरलेला गाळ
मनपा प्रशासनाने बुधवारी ट्रॅक्टरव्दारे या ठिकाणची समस्या सोडविण्यासाठी मुरूम टाकण्यासाठी पाठविल्याचे सांगितल्यानंतर ही समस्या मार्गी लागेल अशी अपेक्षा रहिवाशांंची होती. प्रत्यक्षात मात्र या ठिकाणी मनपाने मुरूम टाकण्याऐवजी नाल्यातून काढलेला गाळ व कचरा या रस्त्यावर टाकण्यात आल्याचा संतापजनक प्रकार घडला. मनपाने या भागातील रहिवाशांची एकप्रकारे थट्टा केली असून, या प्रकाराबाबत रहिवाशांकडून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.
लोकप्रतिनिधी लक्ष देणार का ?
मनपातील सर्वपक्षीय नगरसेवक सध्या आपल्या गटबाजीमध्ये व्यस्त असून, नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले आहे. मनपा प्रशासनाने नागरिकांच्या समस्या सोडविण्याऐवजी केलेल्या थट्टेबाबत लोकप्रतिनिधी लक्ष देणार का ? असा प्रश्न या भागातील रहिवाशांकडून उपस्थित केला जात आहे.