तरूणावर चॉपर हल्ला ; चौघे जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2020 04:19 PM2020-09-22T16:19:18+5:302020-09-22T16:19:32+5:30

जिल्हापेठ पोलिसांची कारवाई : इतर साथीदार अद्याप फरार

Chopper attack on youth; Four arrested | तरूणावर चॉपर हल्ला ; चौघे जेरबंद

तरूणावर चॉपर हल्ला ; चौघे जेरबंद

Next

जळगाव : अंत्ययात्रेत खुन्नस दिल्यावरून १३ रोजी कुसूंबा टोलनाक्याजवळ दोन गट भिडले होते. नंतर जखमींना खाजगी रूग्णालयात दाखल केल्यानंतर पुन्हा रूग्णालयासमोर दोन्ही गट भिडल्यानंतर त्यात एकावर चॉपर हल्ला झाला होता. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस हल्लेखोरांच्या मागावर होते. अखेर चार जणांच्या मुसस्क्या आवळण्‍यात जिल्हापेठ पोलिसांच्या पथकाला यश आले आहे.
सोनू उर्फ कुलदिप पोपट आढाळे (२८, समतानगर), मुकेश उर्फ पप्पू रमेश शिरसाठ (२२) , अजय देवीदास सपकाळे (२१, दोन्ही रा.पिंप्राळा-हुडको) आणि राकेश अशोक सपकाळे (२२, समतानगर) असे चॉपर हल्ला प्रकरणात अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

१३ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास तालुक्यातील कुसुंबा येथे मित्राच्या अंत्ययात्रेत विशाल अहिरे व किरण खर्चे यांचे गट समोरासमोर आल्याने एकमेकांना खुन्नस दिली गेली. अंत्ययात्रा संपताच परतीच्या मार्गावर कुसूंबा टोल नाक्याजवळ हे दोन्ही गट एकमेकांवर तुटून पडले. त्यात चॉपर, लोखंडी सळई, दगडांचा वापर करुन एकमेकांवर हल्ले चढवले गेले. त्यामध्ये दोन जण गंभीर जखमी झाले. जखमींना शहरातील जिल्हा रूग्णालयाच्या आवारातील एका खाजगी रूग्णालयात दाखल करण्‍यात आले होते. एकाचवेळी दोन्ही गट येथे दाखल झाल्यामुळे तेथे तणाव निर्माण झाला. त्यामुळे पुन्हा एकदा दोन्ही गट एकमेकांना भिडले. जखमी झालेल्या किरण खर्चे याच्या गटाला मदत करण्यासाठी आलेल्या खिलेश पाटील तरुणावर या ठिकाणी दुस-या गटाकडून चॉपरने हल्ला करण्यात आला. त्यात खिलेश हा जखमी झाला होता.

पोलिसाच्या फिर्यादीनंतर गुन्हा दाखल
दरम्यान, जखमीचा पोलिसांनी जबाब घेतल्यानंतर त्याने हल्ला करणाऱ्यांच्या विरुद्ध तक्रार देण्यास नकार दिला होता. मात्र, चॉपर हल्ल्याचा प्रकार परिसरातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर संपूर्ण प्रकार समोर आला व अखेर जिल्हापेठ पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी नाना तायडे यांच्या फिर्यादीवरून आठ ते दहा जणांविरोधात तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

यांनी केली कारवाई
चॉपर हल्ला प्रकरणातील संशयितांचा पोलिसांनी शोध सुरू केला होता. अखेर काही जण त्यांच्या घरीच असल्याची माहिती पोलिसांना मिळाली, त्यानुसार मंगळवारी सोनू उर्फ कुलदिप पोपट आढाळे , मुकेश उर्फ पप्पू रमेश शिरसाठ , अजय देवीदास सपकाळे आणि राकेश अशोक सपकाळे या चौघांना पोलिसांनी सापळा रचून अटक केली. ही कारवाई पोलीस निरिक्षक अकबर पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरिक्षक किशोर पवार, जितेंद्र सुरवाडे, नाना तायडे, अविनाश देवरे यांनी केली आहे.

Web Title: Chopper attack on youth; Four arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.