मुक्ताईनगरात कुत्र्यांच्या हल्ल्यात चितळ ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 16:58 IST2020-08-21T16:58:23+5:302020-08-21T16:58:58+5:30
जंगलातून भरकटलेल्या चितळाचा गावठी कुत्र्यांनी पाठलाग करून लचके तोडल्याने चितळ ठार झाल्याची घटना घडली.

मुक्ताईनगरात कुत्र्यांच्या हल्ल्यात चितळ ठार
मुक्ताईनगर, जि.जळगाव : जंगलातून भरकटलेल्या चितळाचा गावठी कुत्र्यांनी पाठलाग करून लचके तोडल्याने चितळ ठार झाल्याची घटना शहरातील गटविकास अधिकारी निवासस्थानाजवळ घडली. ही घटना शुक्रवारी सकाळी साडेसहाला उघडकीस आली.
तीन वर्षे वयोगटातील शिंग असलेल्या चितळ जंगलाकडून भरकटल्याने शहरातील गावठी कुत्र्यांनी चितळाचा पाठलाग करून त्याला दमविले. जुने गाव परिसरात जे.ई. स्कूललगत गटविकास अधिकारी निवासस्थान आहे. येथेच चितळाला गावठी कुत्र्यांनी घेरले आणि त्यावर हल्ला चढविला. त्याचे लचके तोडल्याने चितळ गतप्राण झाले. ही घटना वनविभागास कळविण्यात आली. सकाळी आठला रुईखेडा वनपाल डी.एम.कोळी यांनी मृत चितळास ताब्यात घेतले. त्याची पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी उत्तरीय तपासणी केली व त्यानंतर मृत चितळाचे शरीर वनविभागाच्या दिशानिर्देशाने नष्ट करण्यात आले.