महिंदळे, ता. भडगाव : कोरोना महामारीने गेल्या दोन वर्षांपासून पूर्ण जगाला वेठीस धरले आहे. या महामारीत कुणाचे आप्तस्वकीय कायमचे निघून गेले तर काही घरातील कर्ता पुरुष गेला. काहींचा संसार उघड्यावर आला. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, अनेक विद्यार्थ्यांचे नोकरीचे वय गेले. शाळा- महाविद्यालय बंदच आहेत. नियमांचे पालन करून आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू झाले; पण चिमुकल्यांची शाळा मात्र बंदच असल्यामुळे ते शाळा उघडण्याची वाट पाहत शाळेत येऊन बसतात.
प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा वयोगट लक्षात घेता ऑनलाइन शिक्षणाच्या नावाखाली पालक, विद्यार्थी, शिक्षक भरडले जात आहेत. यातून फक्त ऑनलाइन शिक्षण देणाऱ्या कंपन्या विविध चॅनल कंपन्या, सिमकार्ड कंपन्या, नेट कंपन्या या सर्वांचा कोट्यवधी रुपयाचा फायदा होत आहे.
आज बारकाईने विचार केला तर निवडणुका चालू आहेत. हजारोंच्या उपस्थितीत जनसंपर्क यात्रा चालू आहेत. विविध कार्यक्रमांना नेते मंडळी फिरत आहेत, असं असताना शाळा का बंद? वाड्यावस्त्यांवर पटसंख्या कमी आहे. शाळांना मैदाने भरपूर आहेत, तरीपण शाळा बंदच आहेत.
गेल्या दीड वर्षापासून प्राथमिक शाळा, कॉलेज, महाविद्यालय बंद आहे. आता नवीनच ॲडमिशन घेतलेल्या चिमुकल्यांना तर शाळा कशी आहे व आपले शिक्षक कोण आहेत, हेही माहीत नाही. अजूनही शाळा उघडतील याची शास्वती नाही.
शाळा उघडण्याविषयी शिक्षणमंत्री, आरोग्यमंत्री, मुख्यमंत्री यांच्यात बऱ्याचदा चर्चा झाल्या. तरीही प्राथमिक शाळा उघडण्याचा तोडगा सापडला नाही. कोरोनाची दुसरी लाट काही प्रमाणात ओसरल्यामुळे आठवी ते बारावीचे वर्ग नियमांचे पालन करून सुरू झाले. ती मुलं शाळेत जाऊ लागली, हे पाहून चिमुकलेही शाळेची वाट धरत आहेत. पण लहान मुलांना कोरोनाचा धोका जास्त असल्यामुळे प्राथमिक शाळांना उघडण्याची परवानगी अजून मिळालेली नाही.
यावर्षीही शाळा उघडल्या नाहीत तर या चिमुकल्यांचा प्राथमिक शिक्षण म्हणजे पाया कच्चाच राहील, तर पुढे इमारत कशी उभी राहील ही चिंता पालकवर्गाला सतावत आहे. या शैक्षणिक वर्षात तरी चिमुकल्यांना शाळेची दारे उघडी करा व विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान थांबवा, अशी मागणी पालकवर्ग करत आहे.
250821\25jal_1_25082021_12.jpg
शाळा उघडण्याची वाट पाहत बसलेले चिमुकले