चिमुकल्यांनी साकारल्या तब्बल शंभरावर पर्यावरणपूरक गणेशमूर्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:18 IST2021-09-03T04:18:31+5:302021-09-03T04:18:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : वाघनगरातील विवेकानंद प्रतिष्ठान प्राथमिक शाळा येथे पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्याची कार्यशाळा गुरुवारी आयोजित ...

चिमुकल्यांनी साकारल्या तब्बल शंभरावर पर्यावरणपूरक गणेशमूर्ती
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : वाघनगरातील विवेकानंद प्रतिष्ठान प्राथमिक शाळा येथे पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्याची कार्यशाळा गुरुवारी आयोजित करण्यात आली होती. यावेळी कार्यशाळेत शंभर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून तब्बल १२३ गणेशमूर्ती साकारल्या. विशेष म्हणजे, या गणेशमूर्तींची स्थापना विद्यार्थी स्वत:च्या घरी करणार आहेत.
विवेकानंद प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा गुरुवारी घेण्यात आली. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक हेमराज पाटील, समन्वयिका वैशाली पाटील, सचिन गायकवाड व भाग्यश्री वारुडकर उपस्थित होते. कलाशिक्षक मच्छिंद्र भोई यांनी विद्यार्थ्यांना शाडूच्या मातीपासून गणपती कसा तयार करावा याचे प्रात्यक्षिक करून दाखवले व सोबतच माहितीसुद्धा सांगितली. त्यांच्याबरोबर १०० विद्यार्थ्यांनी कार्यशाळेत शाडूमातीचे सुमारे १२३ गणपती तयार केले. यावेळी विद्यार्थ्यांसोबत त्यांच्या कुटुंबीयांनीसुध्दा गणेशमूर्ती साकारण्याचा आनंद लुटला. कार्यशाळेप्रसंगी हेमराज पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यशाळेसाठी सचिन गायकवाड, वैशाली पाटील, भाग्यश्री वरुडकर यांनी परिश्रम घेतले.