कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांना संगोपनासाठी मिळणार महिन्याला ११०० रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:17 IST2021-07-28T04:17:33+5:302021-07-28T04:17:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोविडमुळे दोन्ही पालक गमावल्याने २० बालक अनाथ झाली असून त्यासोबतच ५१८ बालकांनी कोरोनामुळे आपले ...

कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांना संगोपनासाठी मिळणार महिन्याला ११०० रुपये
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोविडमुळे दोन्ही पालक गमावल्याने २० बालक अनाथ झाली असून त्यासोबतच ५१८ बालकांनी कोरोनामुळे आपले एक पालक गमावले आहेत. तर २८५ महिला विधवा झाल्या आहेत. त्यातील २१५ बालकांना बालसंगोपन योजनेचा लाभ देण्याचे आदेश देण्यात आले आहे. तर या महिलांना संजय गांधी निराधार योजना आणि इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी यादी तहसिलदारांकडे पाठवण्यात आली आहे.
कोविडमुळे पालक गमावलेल्या बालकांची काळजी व संरक्षणासाठी गठीत कृती दलाची बैठक मंगळवारी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पार पडली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण, बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष वैजयंती तळेले, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजयसिंग परदेशी यांची उपस्थिती होती.
यावेळी जिल्हाधिकारी राऊत यांनी सांगितले की, या बालकांना उदरनिर्वाहासाठी दर महिन्याला बालसंगोपन योजनेद्वारे ११०० रुपये दिले जाणार आहेत. तसेच बालकांचे शिक्षण थांबु नये, यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबवण्याचे निर्देश दिले. या बालकांना शिक्षणासाठी लागणारे साहित्य जिल्ह्यातील दानशूर व सामाजिक संस्थांनी उपलब्ध करून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
त्याचबरोबर कोरोनामुळे मृत्यु झालेल्या नागरिकांची माहिती यंत्रणांनी महिला व बाल विकास विभागास तातडीने उपलब्ध करुन द्यावी, निर्देशही जिल्हाधिकारी यांनी दिले.
दोन्ही पालक गमावलेले बालक - २०
एक पालक गमावलेले बालक - ५१८
१८ वर्षाखालील - ४६३
१८ वर्षावरील - ५५
बालसंगोपन योजनेचे आदेश बालकांची संख्या - २१५
बालसंगोपन योजनेद्वारे मिळणारी मदत - ११०० रुपये
कोरोनामुळे विधवा महिला २८५