मालमत्तेसाठी मुलानेच हाकलले जन्मदात्यांना घराबाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:21 IST2021-09-05T04:21:51+5:302021-09-05T04:21:51+5:30
जळगाव : आई, वडिलांच्या नावावर असलेली शेती, घर व जागा आपल्या नावावर होत नसल्याचे पाहून मुलानेच वृध्द आई व ...

मालमत्तेसाठी मुलानेच हाकलले जन्मदात्यांना घराबाहेर
जळगाव : आई, वडिलांच्या नावावर असलेली शेती, घर व जागा आपल्या नावावर होत नसल्याचे पाहून मुलानेच वृध्द आई व वडिलांना मारहाण करुन घरातून हाकलून दिल्याचा प्रकार तालुक्यातील भोकर येथे घडला आहे. दरम्यान, याआधीदेखील मुलाने मारहाण केली होती तर सुनेने विळ्याने वार केल्याची घटना घडली होती, मात्र अद्यापही पोलिसांनी त्यांच्याविरुध्द कारवाई केली नसल्याचा आरोप या वृध्द दांपत्याने केला आहे. या वृध्द दांपत्याने जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.
मुलाच्या लग्नाला १६ वर्ष झाली, मात्र सून १४ वर्ष नांदलीच नाही. आता नांदायला आली तर मालमत्तेसाठी त्यांच्याकडून छळ केला जात आहे. शुक्रवारी मुलगा व सून या दोघांनी दांपत्याला मारहाण केली व घरातून बाहेर काढले. त्यामुळे या दांपत्याने गावातील मंदिरात आसरा घेतला. शनिवारी नातेवाईकाने पुढाकार घेऊन दांपत्याला घरी नेले. जागा व घर स्वत:च्या कमाईचे असल्याने आपण ते त्याला देणार नाही तसेच शेत वडिलोपार्जित असल्याने ते कायद्यानुसार त्याच्या नावावर करायला तयार आहोत. काही मालमत्ता मुलीच्या नावावर केल्यामुळेच मुलगा व सून यांच्याकडून त्रास दिला जात आहे. तालुका पोलीस ठाण्यात ८ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल होऊन देखील तपासी अंमलदारांनी मुलगा व सुनेला अटक केली नाही, असे या दांपत्याचे म्हणणे आहे.