राष्ट्रवादीच्या खासदारांविरोधात फसवणुकीचा गुन्हा
By Admin | Updated: November 21, 2014 15:02 IST2014-11-21T15:02:09+5:302014-11-21T15:02:09+5:30
बनावट नोंदी व शासकीय कागदपत्रे तयार करणे, काळा पैसा पांढरा करण्यासाठी संगनमताने घोटाळा केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या खासदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राष्ट्रवादीच्या खासदारांविरोधात फसवणुकीचा गुन्हा
जामनेर, जि.जळगाव : शेतजमिनीवर जादा सागवान लागवड दाखवून बनावट नोंदी व शासकीय कागदपत्रे तयार करणे, काळा पैसा पांढरा करण्यासाठी संगनमताने घोटाळा केल्याच्या आरोपावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभा खासदार ईश्वरलाल जैन, त्यांचे पुत्र माजी आमदार मनीष जैन यांच्यासह सहा जणांविरुद्व फसवणुकीचा गुन्हा गुरुवारी दाखल करण्यात आला .
फिर्यादी रवींद्र लक्ष्मण बर्हाटे यांनी हा प्रकार माहिती अधिकारात उजेडात आणला. सीआयडीने चौकशी करून ७ डिसेंबर २0१३ रोजी शासनाला अहवाल सादर करून शासनाची फसवणूक झाल्याचे स्पष्ट केले होते.
----------
गुन्हा दाखल करणे, हा प्रत्येकाचा हक्क आहे. सर्वोच्च न्यायालयानेच तक्रार फेटाळता येणार नाही, असे स्पष्ट आदेश दिले आहेत. त्यामुळे आता चौकशी करतील. त्यात निष्पन्न होईल, त्यावर केस चालेल. मात्र मी काहीही चुकीचे काम केलेले नाही. माझा न्यायदेवतेवर पूर्ण विश्वास आहे. जे आहे ते राजकारण चालले आहे. मनीष व मला अटक करून जेलमध्ये टाकू, असे विधान अनेकदा ऐकायला मिळाले आहे. मात्र न्यायालयावर विश्वास आहे.
-ईश्वरलाल जैन, खासदार
(मनीष जैन यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही)
-----------
असे आहेत आरोपी :
ईश्वरलाल शंकरलाल जैन, मनीष ईश्वरलाल जैन, तत्कालीन वनक्षेत्रपाल एस.एस. पाटील, आगार रक्षक जे.व्ही. सय्यद (जामनेर), तत्कालीन तलाठी युवराज दामू सोनार व भिकाजी गोविंद जोशी अशी या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यावर भादंवि ४२0 (फसवणूक), ४६७ (बनावट कागदपत्रे), ४६८ (फसवणूक ), ४७१ (बनावट दस्ताऐवज खरे म्हणून वापरणे) आणि कलम ३४ (संगनमत) या अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.