जळगाव-मुंबई विमानसेवेच्या वेळापत्रकात बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:13 IST2021-07-15T04:13:01+5:302021-07-15T04:13:01+5:30
जळगाव : तांत्रिक कारणामुळे गेल्या एक महिन्यापासून बंद असलेली जळगाव ते मुंबईची विमानसेवा १४ जुलैपासून पुन्हा सुरू झाली आहे. ...

जळगाव-मुंबई विमानसेवेच्या वेळापत्रकात बदल
जळगाव : तांत्रिक कारणामुळे गेल्या एक महिन्यापासून बंद असलेली जळगाव ते मुंबईची विमानसेवा १४ जुलैपासून पुन्हा सुरू झाली आहे. यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला असून, प्रवाशांच्या सोयीसाठी विमान कंपनीतर्फे बुधवारपासून वेळापत्रकातही बदल करण्यात आला आहे.
केंद्र शासनाच्या उड्डाण योजने अंतर्गंत गेल्या दोन वर्षांपासून हैदराबाद येथील ‘ट्रू जेट’ या विमान कंपनीतर्फे जळगाव ते मुंबई विमानसेवा पुरविण्यात येत आहे. उड्डाण योजने अंतर्गंत ही सेवा असल्यामुळे, कोरोनाच्या कठीण काळातही ही सेवा नियमित सुरू होती. मात्र, गेल्या महिन्यात विमान कंपनीतर्फे विमानाचे तांत्रिक काम हाती घेण्यात आल्यामुळे ही सेवा एक महिना बंद ठेवण्यात आली होती. मात्र, विमानाचे तांत्रिक काम पूर्ण झाल्यामुळे, १४ जुलैपासून ही सेवा पुन्हा सुरू झाली आहे. बुधवारी मुंबईहून जळगाव इतके प्रवासी जळगावला आले व जळगावहून इतके प्रवासी मुंबईला रवाना झाले, तर मुंबईहून इतके प्रवासी जळगावला आले असल्याचे विमान कंपनीतर्फे सांगण्यात आले. दरम्यान, प्रवाशांच्या सोयीसाठी विमान कंपनीतर्फे बुधवारपासून विमानाच्या वेळापत्रकातही बदल केला आहे.
इन्फो :
असे आहे सुधारित वेळापत्रक
विमान कंपनीने प्रसिद्ध केलेल्या सुधारित वेळापत्रकानुसार सध्या आठवड्यातून तीनच दिवस विमानसेवा सुरू असल्यामुळे, दर बुधवारी व शनिवारी अहमदाबादहून जळगावसाठी दुपारी दोन वाजता विमान निघणार आहे. जळगावला हे विमान साडेतीन वाजता आल्यानंतर, या ठिकाणाहून मुंबईसाठी पावणे चार वाजता निघून, मुंबईला सायंकाळी पाच वाजता पोहोचणार आहे, तर मुंबईहून साडेपाच वाजता निघून, जळगावला पावणे सात वाजता येणार आहे आणि जळगावहून पुन्हा अहमदाबादसाठी सायंकाळी सव्वा सात वाजता निघणार आहे.
तसेच या विमानसेवेच्या रविवारच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आला आहे. दर रविवारी हे विमान जळगावसाठी अहमदाबादहून सकाळी पावणे दहा वाजता निघून, जळगावला सव्वा अकरा वाजता येणार आहे, तर जळगावहून मुंबईसाठी पावणे बारा वाजता निघून, मुंबईला एक वाजता पोहोचणार आहे, तर मुंबईहून दीड वाजता निघून जळगावला पावणे तीन वाजता येणार आहे आणि जळगावहून सव्वा तीन वाजता अहमदाबादकडे रवाना होणार आहे.
इन्फो :
नाईट लॅडिंगमुळे रात्रीची सेवा
जळगाव विमानतळावर पूर्वी नाईट लॅंडिंगची सुविधा नसल्यामुळे, अनेकवेळा विमान जळगावला न थांबता अहमदाबादला रवाना व्हायचे. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत होती. मात्र, गेल्या वर्षापासून जळगाव विमानतळावर नाईट लॅंडिंग झाल्यामुळे, विमान कंपनीतर्फे विमानाच्या वेळापत्रकात बदल करून, मुंबईहून दर बुधवारी व शनिवारी येणारे विमान सायंकाळी पावणे सात वाजता येणार आहे, तर सायंकाळी जळगावहून सव्वा सात वाजता अहमदाबादला रवाना होणार आहे. दरम्यान, नाईट लॅडिंगच्या सुविधेमुळे मुंबईहून जळगावला यायला विमानाला उशीर झाला तरी हे विमान नाईट लँडिंगच्या सुविधेमुळे जळगावला उतरविण्यात येणार असल्याचे विमान कंपनीतर्फे सांगण्यात आले. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय टळणार आहे.