चंद्रशेखर बावनकुळे आज शहरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:12 IST2021-07-23T04:12:26+5:302021-07-23T04:12:26+5:30
जळगाव : भाजप महाराष्ट्र प्रदेश व युवा मोर्चाचे प्रभारी चंद्रशेखर बावनकुळे व भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील ...

चंद्रशेखर बावनकुळे आज शहरात
जळगाव : भाजप महाराष्ट्र प्रदेश व युवा मोर्चाचे प्रभारी चंद्रशेखर बावनकुळे व भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील हे शुक्रवारी शहरात येणार आहेत. या दौऱ्याअंतर्गत सकाळी १०.१५ वाजता बळीराम पेठ भागातील ब्राह्मण सभेत युवा मोर्चा व जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहे. त्यानंतर सकाळी ११.१५ वाजता हेल्थ वॉरीअर्सची बैठकदेखील घेण्यात येणार आहे.
नगरसेवक आज सादर करणार खुलासा
जळगाव : भाजपने विभागीय आयुक्तांकडे दाखल अपात्रतेच्या प्रस्तावावर बंडखोर नगरसेवक शुक्रवारी आपला खुलासा विभागीय आयुक्तांकडे सादर करणार आहेत. यासाठी नगरसेवकांनी वकिलाची नेमणूक केली आहे. बंडखोर नगरसेवक आपल्या खुलाशात नेमकी काय बाजू मांडतात याकडे लक्ष लागले आहे. तसेच बंडखोर नगरसेवकांकडून भाजपच्या नगरसेवकांनी प्रभाग समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत झुगारलेल्या व्हीपबाबतदेखील विभागीय आयुक्तांकडे अपात्रतेचा प्रस्ताव दाखल होण्याची शक्यता आहे.
१७ हॉकर्सवर कारवाई
जळगाव : शहरातील मुख्य रस्त्यांवर व्यवसाय करणाऱ्या हॉकर्स व इतर विक्रेत्यांवर मनपाकडून कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार शुक्रवारी शहरातील बळीराम पेठ, फुले मार्केट परिसर, सुभाष चौक, दाणा बाजार, गणेश कॉलनी चौक परिसरातील १७ हॉकर्सवर कारवाई केली आहे. या कारवाईदरम्यान मनपा कर्मचारी व विक्रेत्यांमध्ये वाददेखील झाला.
ऑटो नगरातील जागा मनपाने घेतली ताब्यात
जळगाव : राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या ऑटो नगरातील अतिक्रमण मनपाने तोडल्यानंतर गुरुवारी मनपाने ही जागा ताब्यात घेतली आहे. गुरुवारी सायंकाळी ५ वाजता मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी, उपायुक्त संतोष वाहुळे यांनी या जागेची पाहणी केली. तसेच बांधकाम विभागाला लवकरात लवकर या ठिकाणी संरक्षण भिंत तयार करण्याची सूचना मनपा आयुक्तांनी दिल्या आहेत.