मास्टर माईंड शोधण्याचे तपास यंत्रणेसमोर आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:20 IST2021-08-24T04:20:27+5:302021-08-24T04:20:27+5:30
सावदा (ता. रावेर) : येथील बाजार समितीच्या कर्मचाऱ्याने १२ रोजी बनावट पावत्यांचा प्रकार उघडकीस आणला होता. १४ रोजी शनिवारी ...

मास्टर माईंड शोधण्याचे तपास यंत्रणेसमोर आव्हान
सावदा (ता. रावेर) : येथील बाजार समितीच्या कर्मचाऱ्याने १२ रोजी बनावट पावत्यांचा प्रकार उघडकीस आणला होता. १४ रोजी शनिवारी डझनभर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, तर अर्धा डझन कर्मचारी व रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव, सावदा उपबाजार समितीचे सचिव यांसह संशयित आरोपींच्या नातेवाईकांसह मोठा लवाजमा सावदा पोलीस स्टेशनमध्ये जमा झाला होता. तद्नंतर गुन्हा दाखल न करताच सर्वच्या सर्व माघारी फिरले. संचालकांच्या बैठकीचा आडोसा घेत बैठकीनंतरच या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी कारणे सचिवांकडून देण्यात आली.
याप्रकरणी वर्तमानपत्रात बातम्या प्रसिध्द झाल्यावर दि. १७ रोजी संशयित आरोपीवर सावदा पोलीस ठाण्यात संध्याकाळी गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी, तपास थंडावला आहे. यामुळे हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचे बोलले जात आहे. रावेर बाजार समिती व सावदा उपबाजार समिती या दोघा सचिवांच्या भूमिकेबाबत सर्वांचे लक्ष लागून आहे.
सावदा उपबाजार समितीच्या हाकेच्या अंतरावर नाकावर टिच्चून बनावट पावत्या फाडल्या जात होत्या. हे सचिवांच्या कसे लक्षात आले नाही, हा प्रश्न निर्माण झाला आहे. सावदा परिसरातून दररोज उत्तर भारतात केळीने भरलेले शेकडो ट्रक जात असतात. या ट्रक मालकांकडून तीनशे रुपये प्रति ट्रक याप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समिती पावती फाडत शेतकऱ्यांच्या जिवावर लाखो रुपये गोळा करीत असते. या बनावट पावत्या कधीपासून फाडल्या जात असून त्या माध्यमातून किती अवैध वसुली केली, याचा हिशेब लागला पाहिजे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून खऱ्या आरोपीला गजाआड करून शेतकऱ्यांच्या बाजार समितीचा पैसा सुरक्षित केला पाहिजे, अशी मागणी आता शेतकरी करू लागले आहेत.
संशयित आरोपींकडून ३५८ क्रमांकाच्या पुस्तकातील २७ क्रमांकाची पावती फाडली गेली. सावदा उपबाजार समितीची ही पावती २७ जुलैरोजी फाडून पुस्तक कृऊबामध्ये जमा केले होते. त्यामुळे संशयित आरोपी यांच्याकडे बाजार समितीतील कितव्या क्रमांकाचे पुस्तक व कितव्या क्रमांकाची पावती या पंधरवड्यात चालू आहे, अशी माहिती कोण पोहोचवत होता? तो झारीतील शुक्राचार्य कृषी उत्पन्न बाजार समितीमधील आहे की बाहेरील? यामुळे या प्रकरणातील मास्टरमाईंड शोधण्याचे मोठे आव्हान तपास यंत्रणेसमोर आहे.