vidhan sabha 2019 : जळगाव जिल्ह्यात वर्चस्व कायम राखण्याचे भाजपपुढे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2019 12:40 PM2019-09-22T12:40:49+5:302019-09-22T12:42:09+5:30

गिरीश महाजन, एकनाथराव खडसे, गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाची कसोटी

Challenge of BJP to maintain dominance in Jalgaon district | vidhan sabha 2019 : जळगाव जिल्ह्यात वर्चस्व कायम राखण्याचे भाजपपुढे आव्हान

vidhan sabha 2019 : जळगाव जिल्ह्यात वर्चस्व कायम राखण्याचे भाजपपुढे आव्हान

Next

जळगाव : पूर्वीपासूनच भाजपचा गड असलेल्या जळगाव जिल्ह्यात गेल्या निवडणुकीत युती न करता वेगवेगळे लढलेल्या भाजपला सहा तर शिवसेनेला तीन मतदारसंघात विजय मिळाला. यात भाजपने जळगाव शहर मतदार संघ शिवसेनेकडून, चाळीसगाव राष्ट्रवादीकडून, रावेर अपक्षकडून आपल्याकडे खेचला होता तर जामनेर, मुक्ताईनगर या भाजपच्या पारंपारिक मतदार संघात भाजपचे आपले वर्चस्व कायम ठेवले. या वेळीही भाजपला आपले वर्चस्व टिकविण्याचे आव्हान असताना आघाडीही मोठी लढत देण्याचा दावा करीत आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्या मुक्ताईनगर मतदार संघात अशोक कांडेलकर यांना उमेदवारी देण्याची मागणी कोळी समाजाकडून होत आहे. तर शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील हेदेखील उमेदवारीसाठी ताकद लावत आहेत. विद्यमान आमदार असलेल्या जागा भाजपकडेच राहणार असे मुख्यमंत्र्यांसह पालकमंत्र्यांनी संकेत दिल्याने जळगाव शहर मतदार संघात आमदार सुरेश भोळे निश्चित असल्याचे मानले जात आहे. मात्र शिवसेनेच्याही उमेदवारांनी मुलाखती दिल्या आहे, हे विशेष.
जामनेरात तर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना पराभूत करण्याचे आव्हान राष्ट्रवादीचे एकमेव आमदार डॉ. सतीश पाटील यांनी दिले आहे. त्यामुळे या मतदारसंघातील लढत लक्षवेधी ठरणार आहे. खासदार उन्मेष पाटील यांच्या चाळीसगाव मतदार संघात भाजपकडून सर्वाधिक इच्छुक असून खासदारांच्या सौभाग्यवतींचाही यात समावेश आहे.
रावेर मतदार संघात राष्ट्रवादीचे माजी आमदार संतोष चौधरी यांचे बंधू अनिल चौधरी हेदेखील भाजपकडून फिल्डींग लावत आहे. चोपडा मतदार संघात शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांना घरकूल प्रकरणात शिक्षा झाल्याने तेथे शिवसेनेच्या दुसऱ्या गटाकडून तयारी सुरू आहे.
जळगाव ग्रामीण मतदार संघातही गुलाबराव पाटील यांच्याविरुद्ध २०१४ मध्ये लढत देणारे माजी मंत्री गुलाबराव देवकर हे या वेळी देखील राष्ट्रवादीकडून इच्छुक होते. मात्र त्यांनादेखील घरकूल प्रकरणात शिक्षा झाली आहे. एरंडोल मतदार संघाची एकमेव जागा राष्ट्रवादीकडे असून ती देखील आपल्याकडे खेचण्याचा भाजपचा मनोदय असून तसे आव्हान पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आमदार डॉ. सतीश पाटील यांना दिले आहे.
जळगाव जिल्ह्यातील ११ पैकी सहा मतदारसंघात भाजप, तीन शिवसेना, एक अपक्ष तर एका मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असून सर्वच ११ मतदार संघात सत्ताधारी भाजप-शिवसेना युतीशी विरोधी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला सामोरे जावे लागणार आहे, असे आजचे चित्र आहे. यात आता जिल्ह्यातील जळगाव शहर व रावेर असे दोनच मतदार संघ काँग्रेसच्या वाट्याला आले असल्याने आघाडीत मतभेद निर्माण झाले तर आघाडी सत्ताधाऱ्यांना कसे सामोरे जाणार याकडे लक्ष आहे. जिल्ह्यात या निवडणुकीतही दोन्ही काँग्रेसला अस्तित्वासाठीच लढाई लढावी लागणार आहे.
पालकमंत्र्यांचीही प्रतिष्ठा पणाला
पालकमंत्री गिरीश महाजन यांनी ही निवडणूक स्वबळावर लढवायची तयारी म्हणून प्रत्येक मतदारसंघात भाजपची ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न केले आहेत. भाजपमधील नेत्यांना बळ देतानाच दोन्ही काँग्रेसमधील नेत्यांना भाजपमध्ये आणण्याचा प्रयत्न केला. युती झाली तर युतीचे आमदार अन्यथा स्वबळावर लढले तर भाजपचे वर्चस्व कायम ठेवण्याचे आव्हान भाजपचे संकटमोचक असलेल्या गिरीश महाजन यांच्यापुढे आहे. पालकमंत्री म्हणून महाजन यांचीही प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.
काँग्रेसचा भोपळा फुटणार?
स्वातंत्र्यपूर्व काळापासून काँग्रेसचे मोठे अस्तित्व असलेल्या जिल्ह्यात गत निवडणुकीत प्रथमच एकही उमेदवार विजयी झाला नव्हता. यावेळी कॉँग्रेस भोपळा फोडणार का? असा प्रश्न आहे.
संजय सावकारे व शिरीष चौधरी
२००९च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडून आलेले आमदार संजय सावकारे यांनी २०१४मध्ये भाजपमध्ये प्रवेश करीत निवडणूक लढविली व ते विजयीदेखील झाले. या वेळी त्यांच्याच भुसावळ शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांची भाजपकडून निवडणूक लढविण्याची तयारी सुरू आहे. मात्र ते रावेरमधून इच्छुक असल्याने सावकारे यांना उमेदवारी मिळविण्याबाबत तेवढा दिलासा मानला जात आहे. दुसरीकडे महत्त्वाच्या अमळनेर विधानसभा मतदार संघातून प्रथमच व तेदेखील अपक्ष म्हणून निवडणूक लढविलेले आमदार शिरीष चौधरी यांनी विजय मिळविल्यानंतर ते भाजपचे सहयोगी सदस्य झाले. या वेळी त्यांच्याही उमेदवारीकडे जिल्ह्याचे लक्ष राहणार आहे.
शिवसेनेच्या इच्छुकांच्या भूमिकेकडे लक्ष
जळगाव शहर मतदार संघातून शिवसेनेकडून अनेक जण इच्छुक आहे. यामध्ये माजी महापौर विष्णू भंगाळे, मनपातील विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी मुंबई येथे मुलाखतीदेखील दिल्या आहेत. त्यामुळे दोघांपैकी उमेदवारी कोणाला मिळते, हे जरी निश्चित नसले तरी युती झाल्यास ते काय भूमिका घेतात, याकडे लक्ष आहे.
एकनाथराव खडसे यांची कसोटी
पक्षाचे ज्येष्ठ नेते व खान्देशात भाजपला सत्ता मिळविण्यात मोठा हातभार असलेले एकनाथराव खडसे यांच्या मतदारसंघात शिवसेनेकडूनही जोरदार तयारी सुरू आहे. युती झाल्यास जागा कोणाकडे जाणार असा प्रश्न आहेच, कोळी समाजाने वेगळी मागणी केल्याने खडसे यांची कसोटी राहणार आहे.
नशिबी अन् कमनशिबी
२०१४च्या विधानसभा निवडणुकीत आमदार सुरेश भोळे यांनी जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजेच ४२ हजार ३१४ मतांनी विजय मिळविला होता. तर सर्वाच कमी म्हणजेच एक हजार ९८३ मतांचे मताधिक्य एरंडोल मतदार संघातून डॉ. सतीश पाटील यांना मिळाले होते. एकनाथराव खडसे यांनाही ९ हजार ७०८ मतांचे मताधिक्य मिळाले होते.
‘वंचित’चे काय
लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने जोरदार हवा निर्माण केली. जळगावसह रावेर लोकसभा मतदार संघात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार रिंगणात होते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतही जिल्ह्यातील सर्व अकरा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांवर इतर सर्वांचे लक्ष राहणार आहे.
प्रथमच नशीब आजमावलेले
सुरेश भोळे (भाजप, जळगाव शहर)
उन्मेष पाटील (भाजप, चाळीसगाव)
किशोर पाटील (पाचोरा, शिवसेना)
शिरीष चौधरी (अपक्ष, अमळनेर)
विजयाची हॅट्ट्रिक
एकनाथराव खडसे, (मुक्ताईनगर मतदार संघ)
गिरीश महाजन (जामनेर मतदार संघ)
सर्वांत ज्येष्ठ आमदार
एकनाथराव खडसे (भाजप - ३० वर्षे)
मनसेदेखील जिल्ह्यातील सर्व जागा लढविणार असल्याने बहुतांश ठिकाणी तिरंगी लढत होऊ शकते.
दुरंगी लढत
जळगाव शहर
मुक्ताईनगर
जामनेर
तिरंगी लढत
चाळीसगाव
रावेर
जळगाव ग्रामीण
भुसावळ
चोपडा
पाचोरा
एरंडोल
अमळनेर

Web Title: Challenge of BJP to maintain dominance in Jalgaon district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.