चाळीसगावकरांचे कोरोनाशी युद्ध काही थांबेना...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:17 IST2021-07-27T04:17:23+5:302021-07-27T04:17:23+5:30
या तालुक्यांमध्ये केवळ एकाच रुग्णावर उपचार सुरू जिल्ह्यातील पाचोरा, भडगाव, मुक्ताई नगर या तालुक्यांमध्ये केवळ एकच रुग्ण उपचार घेत ...

चाळीसगावकरांचे कोरोनाशी युद्ध काही थांबेना...
या तालुक्यांमध्ये केवळ एकाच रुग्णावर उपचार सुरू
जिल्ह्यातील पाचोरा, भडगाव, मुक्ताई नगर या तालुक्यांमध्ये केवळ एकच रुग्ण उपचार घेत आहे. जळगाव ग्रामीण, धरणगाव व रावेर या तालुक्यांमध्ये प्रत्येकी २ रुग्ण उपचार घेत आहेत.
चाळीसगाव मागे हटेना
चाळीसगाव तालुक्यात १३ जुलै रोजीपर्यंत एकूण रुग्णसंख्या ही ९८८५ एवढी होती, ती २५ जुलैपर्यंत ९९२० पर्यंत पोहोचली आहे. म्हणजेच १३ दिवसात या तालुक्यात ३५ रुग्ण वाढले आहेत. जिल्ह्यातील इतर तालुक्यांपेक्षा ही वाढ मोठी आहे. याच कालावधीत कोरोनाचा हाॅटस्पाॅट बनलेल्या भुसावळात ७, चोपडा ५, जळगाव शहर १०, अमळनेर २ असे रुग्ण आढळले आहेत.
बोदवड, एरंडोल तालुक्यात एकही रुग्ण नाही
जिल्ह्यातील बोदवड आणि एरंडोल या दोन तालुक्यात गेल्या १३ दिवसात एकही नवीन रुग्ण सापडलेला नाही. जे रुग्ण उपचार घेत होते, तेही बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे हे दोन्ही तालुके आता कोरोनामुक्त झाले आहेत.
गंभीर रुग्णांचीही कोरोनावर मात
पहिल्या लाटेत आणि दुसऱ्या लाटेच्या पहिल्या सत्रात अनेक गंभीर रुग्ण हे कोरोनाशी लढता लढता दगावले होते; मात्र सद्यस्थितीत कोरोनाचे अनेक गंभीर रुग्ण हे कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. १३ रोजीच्या अहवालानुसार, जिल्ह्यात ९२ रुग्ण ऑक्सिजनवर होते तर ३२ रुग्ण हे आयसीयुमध्ये होते. २५ रोजीच्या अहवालानुसार, १५ रुग्ण हे ऑक्सिजनवर आहेत तर ५ रुग्णांवर आयसीयुमध्ये उपचार सुरू आहेत. केवळ एकाच रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
पुढील आठवडाभरात अनेक तालुके कोरोनामुक्त होणार?
सध्या कोरोनाचा घसरता आलेख पाहता जिल्ह्यातील मुक्ताई नगर, पारोळा, रावेर, जामनेर, यावल, धरणगाव, भडगाव, पाचोरा आदी तालुके हे कोरोनामुक्त होण्याची शक्यता आहे. कारण येथे उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या १ ते ५ यादरम्यान आहे, तसेच नवीन रुग्ण आढळण्याचे प्रमाणही शून्यावर आले आहे.