चाळीसगाव तालुक्यात होतेय सर्वाधिक वाळू चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:11 IST2021-07-23T04:11:56+5:302021-07-23T04:11:56+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यात वाळू चोरी रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल, आरटीओ आणि पोलिसांची संयुक्त पथके स्थापन केली आहेत. ...

Chalisgaon taluka has the highest number of sand thefts | चाळीसगाव तालुक्यात होतेय सर्वाधिक वाळू चोरी

चाळीसगाव तालुक्यात होतेय सर्वाधिक वाळू चोरी

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्यात वाळू चोरी रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल, आरटीओ आणि पोलिसांची संयुक्त पथके स्थापन केली आहेत. या पथकांनी १ एप्रिलपासून आतापर्यंत एकूण २५३ वाळू वाहनांवर कारवाई केली आहे. त्यात तब्बल ६१ वाहने ही एकट्या चाळीसगाव तालुक्यातील आहेत. गिरणेचे विस्तीर्ण पात्र या तालुक्यात आहे. मात्र, या तालुक्यातील एकाही वाळू गटाचा लिलाव झालेला नाही. त्यासोबतच जळगाव तालुक्यात २६ आणि अमळनेर तालुक्यात ३८ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण २५३ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. जळगाव शहराच्या आसपासच्या सर्व वाळू गटांचा लिलाव झालेला असून देखील ही वाळू चोरी होत आहे.

चाळीसगावला सर्वांत जास्त वाहने पकडण्यात आली असली तरी जळगाव तालुक्यात सर्वांत जास्त दंड आकारण्यात आला आहे. त्याच प्रमाणात सर्वांत जास्त वसुली देखील करण्यात आली आहे. जळगाव तालुक्यात २६ वाहनांवर कारवाई झाली आहे. त्यांना ३३ लाख ७४ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्यातील १७ लाख ६ हजार रुपयांचा दंड देखील वसूल केला आहे. धरणगाव तालुक्यात १४ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. चाळीसगावला २६ लाख ७३ हजार तर पाचोरा येथे २६ लाख ७५ हजार दंड ठोठावण्यात आला आहे.

तसेच आतापर्यंत जिल्ह्यात ९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यातील चाळीसगाव दोन, यावल दोन, अमळनेर दोन, पाचोरा दोन आणि बोदवडला एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत जिल्हाभरात एकूण २५३ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यातील १२८ वाहनांना दंड करून सोडण्यात आले आहे.

बोदवड, भुसा‌वळ, पारोळ्याला कारवाई कमी

जिल्ह्यातील बोदवड, भुसावळ, पारोळा, जामनेर, एरंडोल, रावेर या तालुक्यांमध्ये कारवाई केलेल्या अवैध उपसा करणाऱ्या वाहनांची संख्या कमी आहे. त्यामुळे या तालुक्यांमध्ये अवैध वाळू उपसा कमी होत आहे की फक्त कारवाई कमी होत आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

जिल्ह्यात वाळू चोरी प्रकरणात दाखल गुन्हे - ९

दंड करून सोडलेली वाहने १२८

अवैध उपसा प्रकरणी पकडलेली वाहने - २५३

एकूण दंड - २ कोटी ७७ लाख ८८ हजार ११७ रुपये

वसूल केलेला दंड - १ कोटी ४१ लाख ४१ हजार ७१ रुपये

Web Title: Chalisgaon taluka has the highest number of sand thefts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.