चाळीसगावला पूरग्रस्तांसाठी आठ दिवसांत उभारणार ५० घरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:19 IST2021-09-03T04:19:08+5:302021-09-03T04:19:08+5:30

मंगळवारी झालेल्या अतिवृष्टीने व आलेल्या महापुराने तालुक्यातील ४१ गावांना मोठा फटका बसला असून, कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. जवळपास ...

Chalisgaon to build 50 houses for flood victims in eight days | चाळीसगावला पूरग्रस्तांसाठी आठ दिवसांत उभारणार ५० घरे

चाळीसगावला पूरग्रस्तांसाठी आठ दिवसांत उभारणार ५० घरे

मंगळवारी झालेल्या अतिवृष्टीने व आलेल्या महापुराने तालुक्यातील ४१ गावांना मोठा फटका बसला असून, कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. जवळपास १६ हजार हेक्टरवरील पिकांवर पाणी फिरले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू तेवढे उरले आहे.

बाणगाव, खेर्डे, वाकडी, वाघडू, रोकडे आदी गावांमध्ये अतिवृष्टीची मोठी झळ बसली आहे. काही नागरिकांचे घरांसह संसारही पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने ते उघड्यावर पडले आहेत. शासकीय पंचनामे सुरू असूनही मदत केव्हा मिळणार, हे सांगता येत नाही.

आमदार मंगेश चव्हाण यांनी गत दोन दिवसांत पुराचा फटका बसलेल्या बहुतांशी भेटी देऊन पूरग्रस्तांना धीर दिला आहे.

पुराच्या तडाख्यात ग्रामीण भागात ३५ ते ४० कुटुंबांचा घराचा आधारच नाहीसा झाला आहे. याच कुटुंबांसाठी मायेचा आधार देणारी घरे जबाबदारीच्या भूमिकेतून उभारत आहोत, असेही आमदार चव्हाण यांनी गुरुवारी जाहीर केले.

चौकट

कोटेड पत्र्याची उभारणार ५० घरे; एका घरासाठी ६० हजारांचा खर्च

पुराने घरासह संसारही हिरावून घेतलेल्या पूरग्रस्तांसाठी आमदार चव्हाण हे स्वखर्चाने कोटेड पत्र्याची ५० घरे तातडीने उभारत आहे. आज, शुक्रवारपासून बाणगाव, खेर्डे येथे घरे बांधण्याच्या कामाला सुरुवात होत आहे. बाणगाव येथे १०, तर खेर्डे येथे तीन घरे उभारली जाणार आहेत.

१० फूट लांब व रुंदीचे हे घर कोटेड पत्र्यापासून तयार केले जाणार असून, प्रत्येक घरासाठी ६० हजार रुपये खर्च येणार आहे.

-या घरांना एक दरवाजा व एक खिडकी असणार आहे. खाली तळाला मुरुम टाकून देण्यात येईल.

चाळीसगाव तालुक्यात अतिवृष्टी व पुराने अतोनात नुकसान झाले आहे. नागरिकांना यातून सावरण्याची नितांत गरज आहे. पुरात सर्वस्व गमावलेल्या नागरिकांसाठी जबाबदारीच्या जाणिवेतून तातडीने ५० घरे बांधून देत आहे. आज, शुक्रवारपासून कामाला सुरुवात होईल. येत्या आठ दिवसांत ती पूर्ण करण्यात येतील.

- मंगेश रमेश चव्हाण,

आमदार, चाळीसगाव

Web Title: Chalisgaon to build 50 houses for flood victims in eight days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.