वेटरवर चाकूहल्ला
By Admin | Updated: March 2, 2015 13:04 IST2015-03-02T13:04:24+5:302015-03-02T13:04:24+5:30
कालिंका माता मंदिर परिसरातील हॉटेल सहारामध्ये शनिवारी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास किरकोळ कारणावरून दोन वेटरमध्ये वाद झाला.

वेटरवर चाकूहल्ला
जळगाव : कालिंका माता मंदिर परिसरातील हॉटेल सहारामध्ये शनिवारी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास किरकोळ कारणावरून दोन वेटरमध्ये वाद झाला. संतापलेल्या दोघांनी संतोष देवराम भगत (रा.खेडी बुद्रूक) याच्या छाती व पोटावर सुरीने वार केले. याप्रकरणी दोघांविरुद्ध शनिपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे.
हॉटेल सहारामध्ये संतोष भगत व शिवा उर्फ नवृत्ती हरी गायकवाड (रा.रामनगर, कन्नड) हे वेटर म्हणून कामाला आहेत. दोघे दारू प्यायलेले होते.
शनिवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास शिवा व संतोष या दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. या वेळी संतापलेल्या शिवाने बाजूला पडलेली सुरी घेत संतोषच्या छाती व पोटावर वार केले. तर या ठिकाणी असलेल्या एका १५ वर्षीय मुलानेदेखील संतोषला मारहाण केली. या प्रकारानंतर दोघे पळून गेले. ही बाब हॉटेलमालकांच्या लक्षात आली. त्यांनी अन्य कामगारांच्या मदतीने जखमी संतोषला उपचारासाठी दाखल केले. संतोषच्या छाती आणि पोटावर जबर घाव असल्याने त्याला अतिदक्षता विभागात हलविण्यात आले आहे.
तपासाधिकारी संदीप पाटील यांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. चंद्रकांत अशोक खडके (वय-४३, रा. विठ्ठलपेठ, जळगाव) यांनी फिर्याद दिली आहे.
संतोषवर हल्ला करणारा दुसरा आरोपी हा १५ वर्षाचा आहे. कालिंका माता मंदिर परिसरात त्याच्या वडिलांचे मूर्ती तयार आणि विक्री करण्याचा व्यवसाय आहे. शनिवारी त्याचे वडिलांसोबत भांडण झाले होते. वडील मारहाण करतील या भीतीने तो रात्री घरी न जाता हॉटेलमध्ये झोपण्यासाठी आला होता. या दरम्यान दोघांची मारहाण सुरू झाली, आणि त्यानेदेखील हस्तक्षेप केल्यामुळे त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.