जिल्हा काँग्रेसच्या उपाध्यक्षांवर चाकूहल्ला
By Admin | Updated: March 10, 2017 00:24 IST2017-03-10T00:24:30+5:302017-03-10T00:24:30+5:30
आरोपी ताब्यात : मतभेदातून यावलमध्ये घटना

जिल्हा काँग्रेसच्या उपाध्यक्षांवर चाकूहल्ला
यावल : काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष हाजी शब्बीर खान मोहम्मद खान यांच्यावर शहरातील गजबजलेल्या नगिना चौकात एका माथेफिरूने चाकूने वार केल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली.
दरम्यान, नागरिकांनी हल्लेखोरास पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले़ या वेळी एका युवकावरही हल्लेखाराने वार करण्याचा प्रयत्न केला. शब्बीर खान यांची प्रकृती स्थिर असून काही कारणावरून झालेल्या मतभेदातून हा हल्ला झाल्याचे बोलले जात आहे़
शब्बीर खान (७३) हे नेहमीप्रमाणे त्यांच्या काजीपुरा निवासस्थानातून केळी ग्रुपवर जात असताना इस्लामपुरा भागातील रहिवासी रफीक खान निसार खान (३५) याने पाठीमागून येऊन त्यांच्यावर वार केला. त्यामुळे त्यांच्या उजव्या बाजूच्या बरगडीखाली जखम झाली. दुसरा वार करण्याच्या प्रयत्नात असतानाच त्यांनी त्यास पकडण्याचा प्रयत्न केला़ दोघांची झटापट पाहून चौकातील नागरिकांनी हल्लेखोरास तत्काळ पकडले. यात हाफिज खान सोहेब खान या युवकाच्या खांद्यावरही त्याने वार केला. मात्र त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. (वार्ताहर)