मालवाहतुकीतून मध्य रेल्वेची ११५ कोटींची कमाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:20 IST2021-09-08T04:20:47+5:302021-09-08T04:20:47+5:30
भुसावळ : मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत मध्य रेल्वेच्या मालवाहतूक कामगिरीचा ...

मालवाहतुकीतून मध्य रेल्वेची ११५ कोटींची कमाई
भुसावळ : मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत मध्य रेल्वेच्या मालवाहतूक कामगिरीचा आढावा घेतला. मध्य रेल्वेची मालवाहतूक कामगिरी केवळ दशलक्ष टनांच्या बाबतीतच नव्हे तर, उत्पन्नाच्या बाबतीतही सर्वोत्तम असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
मध्य रेल्वेला पार्सल वाहतुकीतून ११५ कोटीचा महसूल प्राप्त झाला आहे. आढावा बैठकीला बी. के. दादाभोय, अतिरिक्त महाव्यवस्थापक मणीजीत सिंह, प्रधान मुख्य वाणिज्यिक व्यवस्थापक मुकुल जैन, प्रधान मुख्य परिचालन व्यवस्थापक, मध्य रेल्वेच्या सर्व ५ विभागांचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक उपस्थित होते.
अनिल कुमार लाहोटी यांनी नवीन दृष्टिकोनासह ग्राहकांकडे जाण्यावर भर दिला. मध्य रेल्वेद्वारे मालवाहतुकीसाठी विद्यमान वस्तूंचा रेल्वेतील हिस्सा वाढविण्याचा तसेच नवीन वस्तूंची भर घालण्याकरिता सविस्तर चर्चा करण्यात आली.
कोविड लॉकडाऊन आणि अनलॉक दरम्यान मध्य रेल्वेने २०१९-२० मध्ये ६२.४३ दशलक्ष टन मालवाहतूक केली आणि २०२०-२१ मध्ये ६२.०२ दशलक्ष टन मालवाहतूक केली. एप्रिल ते ऑगस्ट २०२१ दरम्यान मध्य रेल्वेने २९.४२ दशलक्ष टन लोड केले आहे जे गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील लोडिंगच्या तुलनेत ४१.७ टक्के अधिक आहे.
मध्य रेल्वेने आपल्या वाढीव उद्दिष्टापेक्षा १.७ टक्केने जास्त वाहतूक केली आहे.
त्यांनी २०२१-२२ दरम्यान ६७.५ दशलक्ष टन लक्ष्याच्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित केले. ऑटोमोबाईलची अतिरिक्त वाहतूक मिळवण्यासाठी वाहतूक वेळ कमी करणाऱ्या एनएमजी रॅकचा वापराचे त्यांनी कौतुक केले. सोलापूर येथील डाळिंब, कांदा, भुसावळ येथून केळी आणि इतर नाशवंत, नागपूरहून संत्रा आणि इतर फळे आणि पुण्यातील साखर यासारख्या वाहतुकीने शेतकऱ्यांना किसान रेल्वेद्वारे मोठी मदत झाली आहे.