कोणतेही कायदे आणताना विद्यमान केंद्र शासन विरोधी पक्ष व जनतेला विश्वासात न घेताच मनमानी पध्दतीने कायदे लागू करत आहे. संविधानाने आखून दिलेल्या नियमांकडे केंद्र शासन दुर्लक्ष करत असून, आजचे केंद्र शासन हे संविधानाला न मानणारे असल्याचा आरोप कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. रविवारी सत्यशोधकी साहित्य परिषदेतर्फे अल्पबचत भवनात आयोजित ‘भारतीय संविधान आणि नागरिक’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुकुंद सपकाळे हे होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड.रवींद्र पाटील, आमदार अनिल पाटील, जिल्हा बँकेच्या अध्यक्ष ॲड. रोहिणी खडसे, ‘लोकमत’ जळगाव आवृत्तीचे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी, महापालिका शिक्षण सभापती प्रा. सचिन पाटील, सत्यशोधकी साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष डॉ. मिलिंद बागुल , माजी आमदार गुलाबराव देवकर, आदी उपस्थित होते. यावेळी मूकनायक पुरस्कार मिळाल्याबद्दल मिलिंद कुलकर्णी यांचा सन्मान करण्यात आला. त्यांच्या व्यतिरिक्त करीम सालार, नायब तहसीलदार कोसुदे यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला.
केंद्र शासन संविधानाला न मानणारे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:02 IST